शिरूर महान्यूज लाईव्ह
नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत संचलन सोहळा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. या समारंभात राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी घोषित करण्यात आले व त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये शिरूर तालुक्यातील निमोणे गावचे सुपूत्र अभिजीत भरत काळे यांना दिक्षांत समारंभात कॅडेट कमांडर म्हणून नेतृत्व करण्याचा बहुमान मिळाला, प्रशिक्षणातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीपदाचा यशवंतराव चव्हाण गोल्ड कप व रिव्हॉल्व्हर ऑफ हॉनर हा बहुमानही मिळाला.
आज नाशिक येथे झालेल्या दिक्षांत समारंभात चार प्रशिक्षणार्थ्यांना गौरविण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे गौरव करण्यात आले. यामध्ये अभिजीत भरत काळे यांना यशवंतराव चव्हाण गोल्ड कप हा ऑल राऊंड कॅडेट ऑफ द बॅच म्हणून प्रदान करण्यात आला. काळे यांनाच रिव्हॉल्वर ऑफ हॉनर हा बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच साठी दिला जाणारा बहुमान देण्यात आला.
रेणुका देवीदास परदेशी यांना सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थ्यासाठी दिला जाणार अहिल्याबाई होळकर कप प्रदान करण्यात आला. तर रुबिया ताजुद्दिन मुलाणी यांना बेस्ट कॅडेट इन ड्रिल हा बहुमान देण्यात आला. प्रशांत हिरामण बोरसे यांना रायफल व रिव्हॉल्व्हर शुटींगमधील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थ्यासाठी दिला जाणारा एन.एम. कामठे गोल्ड कप देण्यात आला.
किरण सुभाष देवरे यांना विधी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पारंगत प्रशिक्षणार्थ्याचा डॉ. बी. आर. आंबेडकर कप प्रदान करण्यात आला. देवरे यांना अभ्यासू प्रशिक्षणार्थ्याचा सिल्व्हर बॅटन, द्वितीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थ्याचा सेकंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच हा पुरस्कारही देण्यात आला.