घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष
एक विवाहित बाई आपल्या नवऱ्याला सोडते आणि आपल्या प्रियकरासोबत जाते. एका वाक्याची ही कथा. पण ही कथा लिहणारा लेखक बदलला की सगळी कथाच बदलून जाते. सध्या भारत आणि पाकिस्तानात हीच कथा घडते आहे. पण अगदी एकाच पद्धतीच्या या समांतर जाणाऱ्या दोन्ही कथांचे भारतीय आणि पाकिस्तानी इंटरप्रिटेशन मात्र अगदी वेगवेगळे आहेत. पण हे असे आजच घडत नाहीये. हजारो वर्षांपूर्वी लिहल्या गेलेल्या अरेबियन नाईटसमध्येही याच पघडीतील दोन कथा आहेत आणि दोन्ही कथांचा शेवट लेखकाने वेगवेगळा केला आहे. आता हजारो वर्षानंतर जवळपास तशाच दोन कथा आपल्या डोळ्यासमोर घडताना आपण पाहतो आहे.
आता अगदी आता आपल्यासमोर घडत असलेल्या दोन्ही कथा पहा ना. एक गोष्ट सीमाची. ही एक पाकिस्तानी मुस्लिम बाई. सोशल मिडियावर भारतीय हिंदू सचीनच्या प्रेमात पडली आणि आपल्या चार पोरांना घेऊन बेकायदेशीरपणे भारतात आली. ही बाई पण वेगळीच आहे. आयुष्य पाकिस्तानात घालवूनही तिच्या बोलण्यात चुकुनही एखादा उर्दू शब्द येत नाही. भारतातल्या राजकीय नेत्यांना घाम फोडणाऱ्या नामवंत तपास संस्थांनी कितीही चौकशीच्या फेऱ्यात अडकवले तरी तिच्या चेहऱ्यावर भीतीची छटाही उमटत नाही. प्रत्येक गोष्टीत हिंदू मुस्लिम करण्याचा ठेका घेतलेल्या प्रसारमाध्यमांनाही सीमाबाबत भुमिका काय घ्यावी हे कळेनासे झाले आहे. एकीकडे तिच्यामुळे टीआरपी वाढतोय पण दुसरीकडे सीमाने त्यांची चांगलीच अडचण करून करून ठेवली. ना भारत पाकिस्तानचा खेळ खेळता येतोय, ना हिंदू मुसलमान करता येतेय. दुसरीकडे पाकिस्तानात तिला एका मिनिटात गद्दार घोषित केले गेले आहे. अर्थातच कथा मोठी रंगतदार आहे.
दुसरीकडे अंजु. ती एका पाकिस्तानी मुस्लीम मित्राला भेटायला म्हणून घरच्यांना न सांगता पाकिस्तानात निघून गेली. मित्र मित्र म्हणता म्हणता तिने म्हणे त्याच्याशी लग्नही लावले. एक महिन्याच्या व्हिसावर गेलेली अंजू आता महिना संपत आला तरी परत येण्याचे नाव घेताना दिसत नाही. तिथे ती देखील पाकिस्तानी प्रसारमाध्यमांना मुलाखती देते आहे. त्यादेखील अगदी सफाईदारपणे. तिच्यावर अनेक भेटवस्तूंचा वर्षाव होतो आहे. सीमाला गद्दार म्हणणारा पाकिस्तानी मिडिया तिच्या एकामागून एक मुलाखती घेत तिच्याकडून पाकिस्तानचे गुणगान गावून घेतो आहे. दुसरीकडे भारतीय मिडियाने अंजुला एक मिनिटात गद्दार घोषित केले आहे. पण सीमाचे काय करायचे हे त्यांना कळेनासे झाले आहे. अंजु पाकिस्तानात जाईपर्यंत सीमा त्यांच्यालेखी पाकिस्तानी गुप्तहेर होती. पण जशी अंजू पाकिस्तानात गेली तशी प्रसारमाध्यमांनी सीमाची बाजू घेण्यास सुरुवात केलेली दिसते. एकुण सगळी गंमत आहे, पण तेव्हाच जेव्हा देश आणि धर्माचे चष्मे बाजूला ठेऊन या सुरस आणि चमत्कारिक कथा वाचण्याचा प्रयत्न केलात तर.
आता हे चष्मे बाजूला काढायचे असतील तर अरेबियन नाईटस वाचा. एक हजाराहून जास्त सुरस आणि चमत्कारिक गोष्टी तुम्हाला इथे वाचायला मिळतील. पण नाईटस लिहणाऱ्या लेखकानेही एक चष्मा चढविलेला आहे, तो आहे धर्माचा, इस्लामचा चष्मा. या चष्म्यामुळेच यातील अगदी सारख्या असलेल्या दोन कथांचा शेवट मात्र लेखकाने वेगवेगळा केलेला आहे.
दोन्ही कथा अरेबियन नाईटसच्या वेगवेगळ्या खंडात आढळतात. दोन्ही जवळपास अंजु आणि सीमाच्या गोष्टींसारख्याच. दोन्हीकडे विवाहित बाई आपल्या नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत गेलेली आहे. पण दोन्हीकडे शेवट निराळा आहे. एका गोष्टीतील बाईला शिक्षा मिळते, तीदेखील मृत्यूदंडाची. दुसऱ्या गोष्टीत मात्र प्रियकर आणि त्या बाईचे लग्न होते आणि त्या बाईचा नवरा मात्र मरतो. आता एकाच तऱ्हेच्या गोष्टीत असे दोन शेवट का केले असतील लेखकाने. याला कारण त्याने चढविलेला धर्माचा म्हणजे इस्लामचा चष्मा.
यातील एका गोष्टीतील सगळी पात्रे मुस्लीम आहेत. नवरा, बाई आणि प्रियकर तिघेही. त्यामुळे या कथेत शेवटी त्या बाईला गुन्हेगार ठरवले गेले आहे. कारण एका मुस्लिम बाईने नवऱ्याकडून घटस्फोट न घेता दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणे इस्लामला मान्य नाही. अर्थाच या धर्माची एक गंमत अशी की पळवून नेणाऱ्या प्रियकराचे केवळ पश्चातापावर भागले आहे, बाईला मात्र जीव गमवावा लागला आहे.
आता दुसरी गोष्ट. इथे नवरा आणि बाई मुस्लिम नाहीत, पण प्रियकर मात्र मुस्लिम आहे. इथे अखेर प्रेमाचा विजय झाला आहे. त्या बाईचे आणि प्रियकराचे मिलन झाले आहे आणि अर्थातच बाईने इस्लामचा स्विकार केला आहे. बिचाऱ्या मुस्लिम नसलेल्या नवऱ्याला मात्र जीव गमवावा लागला आहे.
हजारो वर्षे मध्ये गेली. सुधारणेचा मोठा काळ गेला. जात, धर्म, पंथांच्या पलिकडे जावून माणुसकी शिकविण्याचे हजारो प्रयत्न झाले. पण कथा मात्र अरेबियन नाईटससारखीच सुरु आहे. देश आणि धर्म बदलला की एकच गोष्ट रंग बदलते आहे. मोठी गंमत आहे.