योगेश वाघ, बारामती ट्रेकर्स क्लब
महाराष्ट्र ज्याच्या अंगाखांद्यावर निर्धावलेला आहे तो राकट रांगडा सह्याद्री येणाऱ्या प्रत्येक ऋतू बरोबर रूप बदलत राहतो खास करून जून मध्ये पाऊस घेऊन येणाऱ्या वार्यामूळे सगळे कातळकडे धुंद धुक्याने आणि हिरव्यागार हिरवळीच्या मखमालीने सजून जातात. उंच रानकिल्ल्यांच्या दिमाखदार ऐतिहासिक वास्तूतही उर्जा भरते. कड्याकपारीतुन वाहणारे धबधबे मोहून टाकतात.
पण हे सगळं मायावी आहे. या निसर्ग सौन्दर्याला अनुभवण्यासाठी संयम हवा असतो, जो सध्याच्या तरुणाईत अजिबात दिसत नाही. परवा हरिश्चंद्रगडावर हरवलेल्या व 3 दिवसांनी एका मुलाच्या मृत्यूनंतर सापडलेल्या मुलांची बातमी वाचून खूप वाईट वाटलं. ‘निर्सगसौंदर्य’ हे खूप गोंडस नाव आहे.
खर तर आपल्या डोंगररांगा घनदाट जंगलांनी भरल्या आहेत. विशेषतः पावसाळ्यात त्या भयानक असतात. इन्स्टंग्रामच्या रीलसाठी ट्रेकिंग करणाऱ्या लोकांना सह्याद्रीच्या बदलणाऱ्या रूपाची अजिबात कल्पना नसते, ना सर्वाइव्हल स्किल असतं. अशात तुमच्या सोबत अनुभवी ग्रुप लीडर नसेल तर सहज सोप्पा दिसणारा हा सह्याद्री कधी तुमचा काळ ठरेल समजणार ही नाही . . .
मी अनेक ऋतूत अनेक डोंगररांगा तुडवल्या आहेत. सहज सोप्पा वाटणाऱ्या राजगडावर मधमाश्याच्या डंखाच्या भीतीने झालेले मृत्यू समोर पाहिलेत. सिंहगडाच्या, विसापुराच्या, तोरण्याच्या कपारीत पडून झालेले मृत्यू अनुभवलेत. प्रचंड कसलेल्या ट्रेकर्सना भर उन्हात हिप्नॉटाईस होऊन AMK च्या धारेवर ब्लडप्रेशर लो होऊन गेलेले आणि लिंगण्याच्या, रायगडाच्या भीषणतेचा अनुभव चुकलेले ट्रेकर्स पाहिलेत.
अगदी साप विंचूच नाही तर माकडांच्या दगडफेकीत जीव गमावलेल्या लोकांच्या कहाण्या ऐकल्यात. एखाद्या निर्जन किल्ल्यावर चरणारी गावरान गायही तुमचा जीव घ्यायला पुरेशी होऊ शकते हे हडसर, निमगिरीवर अनुभवलंय. ज्या क्षणी तुमचा संयम सुटतो, त्याक्षणी इथला जंगलचा कायदा होतो लागू होतो. हे कातळकडे, खोल दऱ्या, उंच धबधबे पश्चाताप करायलाही संधी देत नाहीत हा निर्सगाचा नियमच आहे. हे आपल्याला माहीत असायला हवं.
मुळात जून, ऑगस्टमध्ये ट्रेकिंग करावं असा सध्या सहयाद्री राहिला नाही. उन्हाने तापलेल्या डोंगराच्या कडा पावसाचा तडाखा बसला की कोसळून पडतात. गावेच्या गावं गुप्त होतात. अशावेळी स्वतःच्या अतिउत्साहामुळे जीव गमवावा लागलेल्या मुलांच्या बातम्या वाचून खूप दुःख होतं. एकतर त्यामुळे हे किल्ले बदनाम होतात. ट्रेकिंग बदनाम होतंय. यातून शिकलं पाहिजे आणि जाणकार ट्रेकर्सबरोबरच ट्रेकिंग करायला पाहिजे. कारण सह्याद्रीमध्ये तुम्ही तुमच्या इच्छेने जाऊ शकता, पण परत यायला सहयाद्रीची इच्छा असायला लागते.