दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील रावणगाव हे बारा वाड्यांचं गाव. बारा महसुली गावातून देखील या गावाच्या मंडल कार्यालयाचा कारभार अधिकाऱ्याला वाटतो तिथून चालतो. रावणगावचा मंडल अधिकारी कार्यालयात वेळेत उपस्थित नसतो, म्हणून लोकांची गैरसोय होते असे लोकांचे आरोप आहेत. बातमी आली की, तेवढ्यापुरता सर्कल भाऊसाहेब हजर असतो, नाहीतर तो जिकडे सरकेल तिकडेच सर्कल ऑफिसचं काम चालतं. या प्रकाराला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आता तहसीलदारांना निवेदन दिले आहे. अर्थात तहसीलदार तेवढा संवेदनशील असेल तर, नाहीतर येरे माझ्या मागल्या या म्हणीप्रमाणे हे फिरतं सरकारी बिऱ्हाड असंच कायम राहणार, अशीच इथल्या शेतकऱ्यांना भीती वाटते.
रावणगाव (ता. दौंड ) येथे मंडल अधिकारी कार्यालय आहे. रावणगावचे नियुक्त करण्यात आलेले मंडल अधिकारी कार्यालयात सतत गैरहजर असतात. त्यामुळे ग्रामस्थांना महसूल संबंधीत विविध कामांबाबत मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो.
रावणगाव मंडल अंतर्गत मळद, रावणगाव, नंदादेवी, खडकी, चिंचोली, राजेगाव, खानोटा, मलठण, वाटलुज, नायगाव, लोणारवाडी अशी बारा गावे समाविष्ट असताना मंडलाधिकारी हे कार्यालयामध्ये बसून कामकाज न करता खडकी येथील गावकामगार तलाठी कार्यालयामध्ये बसून कामकाज करतात असे येथील शेतकरी सांगतात.
या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैभव आटोळे म्हणाले, रावणगाव येथे विविध महसूली कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय होते. सर्कल भाऊसाहेब पंधरा पंधरा दिवस इथल्या
मंडलाधिकारी कार्यालयाकडे फिरकतच नसल्याने येथील कार्यालयाला बऱ्याचदा टाळे लागलेले असते. नियमानुसार रावणगाव येथे दप्तर ठेऊन कामकाज करणे आवश्यक असताना ते खडकी या ठिकाणी आपले दप्तर ठेऊन कामकाज करत असल्यामुळे ग्रामस्थांनी कामासाठी त्यांच्याशी संपर्क साधल्यास खडकीला या असे नागरिकांना सांगितले जाते.
रावणगाव ग्रामस्थांनी त्यांच्याशी संपर्क साधत रावणगाव या ठिकाणी उपस्थित राहून कामकाज करावे अशी विनंती केली, तर मंडलाधिकारी कार्यालयात पाण्याची सोय नाही. बाथरूमची सोय नाही. अशी थातूरमातुर उत्तरे मंडल अधिकारी ग्रामस्थांना देऊन रावणगाव येथील कार्यालयातून कामकाज करण्यास टाळाटाळ करतात. मंडलाधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन तीन दिवस तरी रावणगाव येथील कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्या विरोधात रावणगाव ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसिदार यांना देण्यात आले आहे.