लक्ष्मण जगताप, बारामती
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शाळा, अभ्यास, परीक्षा, ट्युशन, होमवर्क अशा चक्रव्यूहात आजची मुले अडकली आहेत. त्यांना रोज प्रचंड अशा ताणतणावाला सोमोरे जावे लागतय. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्यातील एका विद्यार्थीनीचा अतिताणातून हदयविकाराच्या तीव्र झटक्याने वर्गात झालेला मृत्यू होय. समस्त पालक वर्गाला प्रचंड मोठा धक्का देणारी ही घटना आहे.
मुले आणि त्यांचे शिक्षण आज आपण कोणत्या मार्गाने घेऊन चाललो आहोत ? याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. ताणतणावाला सामेरे कसे जायचे हे मुलांना आपण शिकवतो का? शाळेतील त्यांची शैक्षणिक प्रगती यावर पालक म्हणून आपले समाधान होते का? हा खरा प्रश्न आहे.
सकाळी उठले की शाळा.शाळेतून आले की खाजगी क्लास. क्लासवरुन घरी आले की शाळेचा आणि क्लासचा होमवर्क तोही मध्यरात्रीपर्यंत. मुलांनी झोपायचे कधी.? त्यांना विश्रांती नको का ? त्यांनाही मेंदू आहे. तोही थकत असेल .त्यांनाही कंटाळा येत असेल.पालक म्हणून आपण त्यांना समजून कधी घेणार आहोत की नाही ?
मुले म्हणजे मार्कस मिळवून देणारे मशीन नव्हे . हे आपल्याला कधी समजणार ? अशा अनेक मुलांचा जीव गेल्यावर ? खरं तर मुले हीच आपली संपत्ती आहे. तेच आपले सर्वस्व आहे. त्यांना असे गमावून कसे चालेल ?
मान्य आहे आजच्या काळात शिक्षणाला कमालीचे महत्त्व आले आहे.शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मेहनत घेतल्याशिवाय मुलांचे स्वप्न पूर्ण शकत नाही. करिअर होऊ शकत नाही. हे सगळं जरी खरं असले तरी अतिताणतणावाने मुलांना आपल्यातून जाऊ देणे कितपत योग्य आहे ?
प्रत्येक मुलाला जन्मतःच काही नैसर्गिक क्षमता मिळालेल्या असतात.त्याचा कल आवड आणि क्षमता पाहून त्याला शिकण्यास प्रोत्साहन देणे हे पालक, शाळा आणि शिक्षकांचे काम असते. शिक्षण घेत असताना मुलांवर अतिताणतणाव येणार नाही. मुक्त वातावरणात हसत खेळत शिक्षणाचा आनंद घेता यायला हवा. तरच त्याची शिक्षणातील रुची वाढेल. त्याच्या अंगी असणाऱ्या नैसर्गिक क्षमतांना पुरेपूर वापरुन हाती येणारे यश यावर पालक म्हणून आपण निश्चित समाधानी व आनंदी रहायला हवे.
आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचे माध्यम म्हणून आपण मुलांचा वापर करतो. म्हणून त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादले जाते. दुसऱ्या मुलांशी तुलना केली जाते. पाल्य मागे या जगात मागे राहतो काय? अशी भीती पालकांना सतावत राहते. त्या भितीतून पालकांवर ताण येतो. तो ताण मुलांवर टाकला जातो. त्यामुळे मुले तणावाखाली वावरतात.त्यांना धड बोलण्याचे स्वातंत्र्य नसते. करिअरसाठी तुला मेहनत करावे लागेल हेही सतत ऐकावे लागते.
प्रत्येक मूल हे वेगळे असल्याने प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे एकमेकांची तुलना करणे गैर ठरते. तसेच मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवण्याचा विचारही चुकीचा असतो. खरं तर त्यांच्या समजून घेणे आणि त्यांना विश्वास देणे गरजेचे असते.
मुलांच्या अंगभूत क्षमतानुसार त्यांना शिकू देणे.त्यांना प्रोत्साहन देणे एवढेच पालकांचे काम असते.आणि अपयश आल्यावर खंबीरपणे पाठीशी उभे राहणे. त्यामुळे मुलांना आत्मविश्वास येतो.माझे पालक माझ्या पाठीशी आहेत.या आनंदाने मुलांना नवचैतन्य आणि ऊर्जा मिळते.त्यांची शैक्षणिक प्रगती भरारी घेत राहते.आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो.
(लेखक शिक्षक आहेत व सामाजिक कार्यात सहभागी असतात. लेखकाशी इथे संपर्क साधा -9423249996