सणसर – रविवार म्हणजे सणसर (ता. इंदापूर) चा आठवडे बाजाराचा दिवस..या दिवशी गावात आठवडे बाजार सुरू होता, तर प्राथमिक शाळेत सरकारच्या वीस विभागातील अधिकारी, कर्मचारी सकाळपासून अर्ज भरून घेणे, दाखले देण्याचे काम करीत होते. महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून आज सणसर येथे शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला, नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे सणसरची शाळा एखाद्या जत्रेसारखी फुलून गेली होती.
महसूल विभाग व सणसर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आज आयोजित करण्यात आला. वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सणसर येथे या उपक्रमाचे उदॆघाटन केले.दाखला, शिधापत्रिका, परवाना किंवा योजनेचा सहभाग घेण्यासाठी सामान्य लाभार्थ्यांना अनेकदा चकरा माराव्या लागतात, त्याऐवजी त्या गावातच सर्व विभागांनी त्यांचे काम करून देण्याची ही योजना होती.
सणसर येथे महसूल, शिक्षण, पशुसंवर्धन, पोलिस, महिला व बालविकास, महावितरण, आरोग्य, ग्रामविकास अशा सर्वच विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या ठिकाणी परिसरात दोन दिवस दवंडी देऊन लाभार्थ्यांना अर्ज देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या अर्जानुसार त्यांचे दाखले तयार करून लाभार्थ्यांना ते देण्यात आले.
तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, सणसरच्या सरपंच माधुरी नरुटे, उपसरपंच यजुवेंद्रसिंह निंबाळकर यांच्यासह सदस्य, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्यासह परिसरातील सर्व संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
दत्तात्रेय भरणे, वन राज्यमंत्री – सर्वसामान्यांची कामेही छोटी असतात, मात्र त्यांना सरकारी कार्यालयांत सारखे हेलपाटे मारायला लागू नयेत, त्यांचे दाखले वेळेत म्हणजे अगदी एका दिवसांत देण्यासाठी हा उपक्रम आहे. इंदापूर तालुक्यातील सर्व जिल्हा परीषद गटांमध्ये हा उपक्रम घेणार आहे.










