दौंड : महान्यूज लाईव्ह
नवरा दारू पिऊन येऊन त्रास देतो म्हणून वैतागलेल्या बायकोने लाकडी दांडक्याने मारून नवऱ्याला गंभीर जखमी केले. उपचारदरम्यान या नवऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आरोपी पत्नी विरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दौंड तालुक्यातील चौफुला नजीक घडली.
याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पल्लवी संतोष पवार (रा. चौफुला, नवागाव ता. दौंड) हिच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेत पल्लवी हिचा नवरा संतोष आबासाहेब पवार याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संतोषचा चुलतभाऊ सचिन दत्तात्रय पवार (वय २५ वर्षे, व्यवसाय : खाजगी नोकरी रा. वरवंड गोपीनाथ मंदिराच्या जवळ ता. दौंड जि. पुणे) यांनी फिर्याद दिली.
याप्रकरणी यवत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना 22 जुलै 2023 रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घडली तर गुन्हा 30 जुलै 2023 रोजी दाखल करण्यात आला. ही घटना चौफुला नवागाव गावच्या हद्दीत यमुनाबाई शिंगटे यांच्या खोलीत घडली.
फिर्यादीनुसार सचिन पवार यांचा चुलतभाऊ संतोष हा दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणावरून त्याची पत्नी पल्लवी हिने त्याच्या डोक्यात, हातावर लाकडाने मारहाण केली. त्यामध्ये तो जखमी झाला. त्याला त्रास होऊ लागल्याने व चक्कर येऊ लागल्याने त्यास दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र ससून रुग्णालयात उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री वाबळे करत आहेत.