दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
घटना वाई तालुक्यातील चांदक या गावातील दहावीत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय अथर्व संकपाळ याने काही मुलांच्या पैसे मागण्याच्या त्रासाला कंटाळून घरातच आत्महत्या केली. या घटनेने फक्त गावच नाही तर संपूर्ण वाई तालुका हादरून गेला. अथर्व हा चांदक गावच्या सरपंचांचा मुलगा, त्यामुळे तर या प्रकरणाला अधिकच महत्त्व आले होते. मात्र भुईंज पोलिसांनी कर्तव्यतत्परता दाखवत अगदी चार दिवसातच वेगवान हालचाली केल्या आणि घटनेला जबाबदार आरोपी पकडले.
चांदक (ता.वाई)येथील १५ वर्षीय अथर्व संकपाळ यास मयुर जीवन जाधव (वय १९ राहणार शेंदुरजणे) तर दुसरा अल्पवयीन मुलगा सतत पैशाची मागणी करत होते. या त्रासाला कंटाळून अथर्व याने राहत्या घरात आत्महत्या केली. याप्रकरणी भुईंजचे सहाय्यक निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या पथकाने येथील अल्पवयीन मुलाला वाई शहरातून ताब्यात घेतले तर शेंदुर्जने येथील मयूर जाधव यालाही सापळा लावून ताब्यात घेतले. सखोल चौकशी केल्यावर या दोघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिली.
संशयित आरोपींना भुईंज पोलिस ठाण्यात आणुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन वाईच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना २ ऑगस्ट पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर यांच्या पोलिस पथकाने केलेल्या या कारवाईबद्दल जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, वाईचे डिवायएसपी बाळासाहेब भालचीम यांनी या पथकाचे अभिनंदन केले