लोणी काळभोर : महान्यूज लाईव्ह
धाकटा भाऊ दवाखान्यात उपचार घेतोय म्हणून थोरल्याची काळीज तीळतीळ तुटत होते. धाकट्याच्या उपचाराकडे थोरल्याचे लक्ष होते, पण धाकट्या भावाने उपचारादरम्यान प्राण सोडल्याची माहिती मिळाली आणि थोरल्यानेही जणू आता आपले जन्मकार्य संपले अशी खूणगाठ बांधली, कारण दुसऱ्याच दिवशी थोरल्याही भावाने जगाचा निरोप घेतला. ही घटना कुंजीरवाडी परिसरात घडली.
कुंजीरवाडी येथील दशरथ विनायक गायकवाड यांचे वयाच्या 72 व्या वर्षी खाजगी दवाखान्यात उपचार दरम्यान निधन झाले. त्यांचे निधन 26 जुलै रोजी झाले आणि त्याची बातमी समजताच त्यांचे 79 वर्षीय थोरले भाऊ जयवंत विनायक गायकवाड हे अस्वस्थ झाले.
बुधवारी धाकट्या भावाचे निधन झाले आणि गुरुवारी सकाळी अचानकच जयवंत गायकवाड हे जमिनीवर कोसळले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते अशी माहिती डॉक्टरांनी दिली. दोन दिवसातच दोन सख्ख्या भावांचे निधन झाल्याने परिसरातही हळहळ व्यक्त केली जात होती.