मुंबई : महान्यूज लाईव्ह
काहीही करून यावेळीची लोकसभा एक हाती जिंकायची, यासाठी भाजपने अनेक प्रयोग केले. नीती आणि अनितीच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या या प्रयोगाने राज्यातील जनता संतप्त झाली आहे. त्याचे पडसाद अजूनही कायम आहेत. त्यामुळेच नुकतेच इंडिया टीव्ही ने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 24 जागा एनडीएला तर 24 जागा नव्या म्हणजेच इंडियाला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अर्थात संपूर्ण राज्य एका बाजूला करून देखील सत्तेचा फायदा भाजपला मिळणार नाही असाच नवा सर्वे सांगतो आहे. त्यामुळेच या नव्या सर्वेमुळे भाजपसह शिंदे गट व अजित पवार गटाच्या चिंता वाढल्या आहेत. इंडिया टीव्ही आणि सी एन एक्स या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे.
यामध्ये अजितदादांचा गट सत्तेत जाऊनही लोकसभेत महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे या सर्वे मध्ये अजितदादांच्या गटाचे मतदानाचे प्रमाण देखील खूप कमी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर पहिले सर्वेक्षण समोर आले असून, यामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक वीस जागा मिळतील, मात्र यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तीन जागांचे नुकसान होईल. पण आज जिथे फुटलेल्या शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांचे पाच खासदार आहेत, तिथे 11 खासदारांपर्यंत वाढ होऊ शकते असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आत्ता लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर शिंदे गट व अनितांच्या गटाला धक्का बसेल असे चित्र वर्तवण्यात आले असून मोठी फूट पडून देखील महाराष्ट्र विकास आघाडीचे आव्हान मात्र कायम असल्याचे या सर्वेक्षणातून दिसते. यामध्ये महाविकास आघाडीच्या जागा पश्चिम महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता वर्तनात आली आहे, तर विदर्भात दहा जागांपैकी दोन्ही आघाड्यांना प्रत्येकी पाच जागा मिळतील असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. आता अजित पवार गटाबरोबर एक खासदार असून आणखी एक त्यामध्ये वाढ होऊ शकते असेही सांगितले आहे.
2019 च्या विधानसभेमध्ये भाजपच्या 23, शिवसेनेच्या 18, राष्ट्रवादीच्या चार व काँग्रेसची एक जागा होती. मात्र आत्ता निवडणूक झाल्यास भाजपला 20, शिवसेनेला शिंदे गटाला 2, व राष्ट्रवादी दादा गटाला 2 जागा मिळतील, तर इंडिया मधील शिवसेनेच्या ठाकरे गटाला 11, काँग्रेसला 9 व राष्ट्रवादी पवार गटाला 4 जागा मिळतील असे चित्र वर्तवण्यात आले आहे.