मालमत्तेसाठी भावजयीच्या वडिलांचा खून केलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ! एका व्हिडिओमूळे बिंग फुटले! वरवंड येथे एक वर्षापूर्वी घडली होती घटना !
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वरवंड येथे वहिनीला तिचे वडील मरणानंतर मालमत्ता देणार नाहीत त्याचा राग मनात धरून वहिनीच्या वडिलांची वन विभागाच्या जमीनीमध्ये मित्रांच्या साह्याने गळा दाबून खून करणाऱ्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली असून त्यांना ४ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दौंड न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ समोर आल्याने एक वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाचा उलगडा झाला असून आरोपींनीच या घटनेच्या केलेल्या या व्हिडिओने त्यांना जेलचा रास्ता दाखवला आहे.
दौंड तालुक्यातील वरवंड येथील राकेश भंडारी याने २७ मार्च २०२२ रोजी आपली वहिनी सपना राहुल भंडारी यांना त्यांचे वडील सुरेश नेमीचंद गांधी हे त्यांचे मृत्यूनंतर मालमत्तेमध्ये हक्क देणार नाहीत याचा राग मनात धरून वरंवड हद्दीतील वन विभागाच्या जमीनीमध्ये सुरेश नेमीचंद गांधी यांचा गळा दाबून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी ते घरामध्ये पाय घसरून पडुन मयत झाले असा बनाव करुन तशी माहिती सर्व नातेवाईकांना सांगुन त्यांचा अंत्यविधी केल्याची घटना घडली होती.
मात्र तब्बल एक वर्षानंतर वरवंड येथील कालीदास शिवदास शिंदे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एका व्हिडिओच्या आधारे ही घटना उघड झाली असून याप्रकरणी अतुल जगताप, प्रणव भंडारी, विजय मंडले, राकेश भंडारी (सर्व रा.वरंवड ता.दौड जि.पुणे ) या चार आरोपींनी पोलीसांनी अटक केली होती. या घटनेचा सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी तपास केला आहे.
पोलीसांनी या आरोपींना दौंड न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. ३० जुलै रोजी त्यांची पोलीस कोठडी संपल्याने पोलीसांनी त्यांना आज दौंड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली असून त्यांना ४ ऑगस्ट पर्यंत पोलीस ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनेमुळे वरवंड परिसरासह दौंड तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. न्यायालयाने या गुन्ह्याचा अधिक आणि सखोल तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली असून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे या गुन्ह्याचा कसून तपास करत आहेत.