जीवन सोनवणे – महान्यूज लाईव्ह
शिरवळ : शिरवळमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता जुन्या वादातून असिफ उर्फ बाबा युसूफ मुजावर वय 32वर्ष या तरुणावर हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे.
ही घटना शिरवळ पोलीस स्टेशन परिसरात घडली असून याप्रकरणी रोहन गुजर व आप्पा काकडे (दोघे राहणार शिरवळ) व अनोळखी चार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळ मधील शहाजी चौक परिसरात राहणारा असिफ उर्फ बाबा युसूफ मुजावर (वय 32 वर्ष) हा बेकरी व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास असिफ हा शाही मशीदीत नमाज पठणासाठी घराबाहेर निघाला.
तेव्हा शासकीय विश्रामगृह मार्गे चावडी चौक या ठिकाणी रोहन गुजर व आप्पा काकडे व त्यांचे इतर चार अनोळखी साथीदार यांनी हातातील स्प्रे डोळ्यात फवारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आसिफ कसाबसा आपला जीव वाचवून समोरचे काही दिसत नसताना आपली गाडी तसेच चालवत समोर असलेल्या मशिदीमध्ये गेला. त्यानंतर त्याने पोलिसांकडे वरील दोघे व अनोळखी चौघांविरोधात फिर्याद दिली. पुढील तपास संजय केंगले करीत आहेत.