बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामतीतील तीन हत्ती चौकातील सिटी सेंटर आता वेगाने पूर्ण होईल, कारण गेली काही वर्षे रखडलेली रेल्वेची जागा आता ३५ वर्षांच्या भाडेतत्वावर मिळाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वप्नातील सिटी सेंटरच्या कामाला आता उद्यापासूनच वेगाने सुरवात होणार आहे.
आज यासंदर्भात नगरपरीषदेचे गटनेते व बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी पत्रकार परीषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून हे काम रखडले होते. नगरपरीषदेला रेल्वेच्या जागेतून सेवा रस्ता करण्यासाठी रेल्वेची जागा लागणार होती. मात्र रेल्वे विभागाच्या तांत्रिक अटींमुळे हे काम रखडले होते. त्यातच ही जागा सार्वजनिक कामासाठी घेताना रेल्वेच्या ज्या अटी होत्या, त्यातील रक्कम अवाढव्य होती. ती नगरपरीषदेच्या आवाक्याच्या बाहेर होती.
त्यावेळी नगरपरीषदेच्या वतीने आम्ही विरोधाचीही भूमिका घेतली होती. रेल्वे मालधक्क्याच्या येणाऱ्या वाहनांसाठी रेल्वेने त्यांचा स्वतःचा मार्ग अवलंबावा अशी भूमिका घेतली, मात्र दादा व सुप्रियाताईंच्या मध्यस्थीने हे आंदोलन थांबवले व रेल्वेनेही याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वेच्या अशा जागा सार्वजनिक कामांसाठी वापरताना त्याचे मुल्य कमी असावे व संपूर्ण देशातच त्याचे एक तत्व असावे अशी मागणी केली होती.
त्यानंतर ६ ऑक्टोबर २०२२ रोजी रेल्वेच्या जागा सार्वजनिक कामासाठी वापराकरीता देण्याचा दर कमी करण्याचा प्रस्ताव रेल्वेने मंजूर केला आणि त्यानंतर बारामती नगरपरीषदेच्या या जागेसाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनीही खूप मोठी मदत केली.
त्यांनी प्रस्ताव दाखल करून ही जागा मंजूर करून घेतली. केवळ १ कोटी ३१ लाखांच्या रकमेत ३५ वर्षांसाठी ७५० मीटर लांब व ७.५ मीटर रुंद अशी जागा मिळणार असल्याने आता तीन हत्ती चौकापासूनचा सेवा रस्ता होईल व सिटी सेंटर करण्याचे स्वप्न आता पूर्ण होईल. उद्यापासूनच या कामाला सुरवात होणार आहे.