जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
खंडाळा: तालुक्यातील बहुचर्चीत आणि कित्येक वर्षापासुन प्रतिक्षेत असलेल्या ट्रामा केअर सेंटरसाठी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातुन 8 कोटी 74 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. या कामाचे टेंडर निघाले असुन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने तालुकावासीयांकडून आनंद व्यक्त होत आहे.
खंडाळा हे तालुक्याचे ठिकाण व नजीक खांबटकीचा अवघड घाट, त्यातील एस वळणावर वारंवार होणारे मोठे अपघात होत होते. खंडाळा परिसरातील औद्योगिक क्षेत्रात होणारे अपघातांची दखल घेता खंडाळा याठिकाणी ट्रामा केअर सेंटरची अनेक वर्षांची मागणी होती. 2013 मध्ये या ट्रामा केअर सेंटरला मंजुरी मिळाली होती.
पण, याचे गांभीर्य लक्षात न घेतल्यामुळे या ठिकाणी असलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची असलेली जागा ग्रामीण रुग्णालयाच्या नावे नसल्यामुळे मंजुर असलेले काम रखडले . याबाबत सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी अनेक वेळा पत्र व्यवहार करुन वेळो वेळी आंदोलनात्मक पवित्रा घेतला. त्यामुळेच प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा ग्रामीण रुग्णालयाच्या नावे झाली. यानंतर निधी उपलब्ध करुन घेऊन मोजणी प्रक्रिया पुर्ण झाली.
इमारत आराखड्याची सुरवात झाली .या ट्रामा केअर सेंटर साठी खंडाळा शहरातील 14 शेतकरी बांधवांनी आपली शेतजमीन ही प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा दिली आहे. संबंधित सर्व विभागांनी वेळो वेळी सहकार्य केले. खंडाळा तालुक्याच्या ठिकाणी अनेक अडीअडचणींवर मात करत अखेर ट्रामा केअर सेंटरसाठी 8 कोटी 74 लाखाचा निधी मंजुर झाला आहे.
कामाचे टेंडर निघाले असुन 18 ऑगस्टपर्यंत कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण होणार असुन लवकरच कामास सुरुवात होणार आहे. आरोग्य मंत्री दीपक सावंत, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण रुग्णालय कार्यालय प्रमुख , ग्रामीण रुग्णालयाचे माजी वैद्यकिय अधिक्षक डाॅ. रविंद्र कोरडे या सर्वांचे सहकार्य मिळाले.
वाई, खंडाळा, महाबळेश्वरचे स्थानिक आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून अंतिम रीत्या ट्रामा केअर सेंटरसाठी निधी मंजुर झाला आहे. यामुळे येथे ट्रामा केअर सेंटरचा प्रश्न मार्गी लागला आहे. या ट्रामा केअर सेंटरसाठी खंडाळा शहरातील 14 शेतकरी बांधवांनी आपली जागा दिली आहे.