अभियांत्रिकी महाविद्यालयांप्रमाणे पशुवैद्यकीय महाविद्यालयांची स्थिती होण्याची भीती
जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
शिरवळ . ता . २८ : शासनाकडे नवीन प्रस्तावित असलेल्या डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स हा अभ्यासक्रम रद्द करावा व शेतकऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी सध्याच्या रिक्त जागांवर पशुवैद्यकीय डॉक्टरांची (पशुवैद्यकीय पदवीधर) नियुक्ती करावी. या मागणी साठी आजपासुन येथील पशुवैदयकीय महाविद्यालयातील विद्यार्थी बेमुदत संपावर गेले आहेत . त्यानुसार सर्व प्रशासकीय काम बंद करुन महाविद्यालयाचे गेट बंद करत सर्व विद्यार्थी रत्यावर उतरले आहेत.
महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) कायद्यामध्ये बदल करून नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्याचा निर्णय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घेण्यात आला. या विरोधात राज्यभरातील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या सोबत शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय मधील विद्यार्थी देखीलआक्रमक झाले असून शुक्रवारी त्यांनी महाविद्यालयांसमोर आंदोलन केले.
दरम्यान,आज सकाळी महाविद्यालयीन बहुसंख्य विद्यार्थी हे महाविद्यालयाच्या गेटवर जमले होते . यावेळी आपल्या मागण्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . यावेळी शिरवळ पोलिसांनीही भेट देऊन माहिती घेतली .
राज्यात पशु, दुग्ध आणि मत्स्य व्यवसायात अधिक प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे कारण देत खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम १९९८ मध्ये सुधारणा करण्यात आली.
सध्या नागपूर येथील पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत १० महाविद्यालयांमध्ये ५५७ पदवी आणि २१६ पदव्युत्तर प्रवेशाची क्षमता आहे. कमी प्रवेश क्षमता असतानाही रोजगार मिळणे कठीणझाले आहे. राज्यात काही वर्षांआधी असाच विचार करून खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली होती. परंतु आज अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांना घरघर लागली.
पदविका अभ्यासक्रमालाही विरोध
महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये बारावीच्या इंग्रजी विषयांतर्गत पशुवैद्यकीय विज्ञान विषयातील तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम अर्थात ‘डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स’ सुरू करण्याची योजना आखली जात आहे. याला राज्यभरातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचा विरोध आहे. महाराष्ट्र पशुवैद्यकीय विद्यार्थी संघटनेंतर्गत यासाठी आंदोलन करण्यात आले. विद्याथ्यांच्या म्हणण्यानुसार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पशुवैद्यकीय महाविद्यालयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथे इतर राज्यांच्या तुलनेत दरवर्षी मोठ्या संख्येने पदवीधर उत्तीर्ण होत असल्याने राज्यात आधीच हजारो पशुवैद्यकीय पदवीधर बेरोजगार आहेत.
सरकारची भूमिका काय
राज्यात पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रात तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्यप्राप्त पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे कायमस्वरूपी विनाअनुदानित खासगी महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती, असा दाखला यासाठी सरकारने दिला आहे.
काय आहे पशुवैद्यकीय पदवीधर विद्यार्थी संघटनेची मागणी
खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेबाबत (MAFSU ) माफसु कायदा (2023 ) च्या दुरुस्तीला आमचा तीव्र विरोध असुन, यासाठी विद्यार्थी संघटनेला विचारात घ्यावे. तसेच सर्व पशुवैद्यकीय दवाखाने ग्रेड 2 श्रेणी 1 मध्ये श्रेणीसुधारित केले जावे आणि या पशुवैद्यकीय दवाखान्यांचा प्रभारी IVC कायदा 1984 नुसार पदवीधर पशुवैद्यकीय (नोंदणीकृत) असावा.
खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करू नयेत. प्रस्तावित अकोला व अहमदनगर शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय आधी सुरू करण्यात यावे.तसेच शेतकऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी सध्याच्या रिक्त जागांवर पशुवैद्यकीय डॉक्टरांची (पशुवैद्यकीय पदवीधर) नियुक्ती करावी. यासाठी संपूर्ण नवीन डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज नाही.