सातारा : महान्यूज लाईव्ह
साखर कारखाना अधिकाऱ्यांच्या विश्वास आणि मेहनतीवर चालतो; पण हे अधिकारीच नालायक निघाले तर? ज्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायचा त्यांनीच कारखाना लुटला तर? फलटण तालुक्यातील कापशी येथील शरयू इंडस्ट्रीज या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या ठेकेदार व अभियंतांनी संगनमत करून कारखान्याची तब्बल 1 कोटी 15 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणंद पोलिसात पाच जणांवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन 2021 पासून आज पर्यंत या घटना घडल्याचे पोलीस फिर्यादीत नमूद करण्यात आले असून, याप्रकरणी पोलिसांनी फॅब्रिक इंडस्ट्रीज व ऍक्युरेट इंजीनियरिंग अँड इरेक्शन यांच्यावतीने काम करणारे वसंत लोढा या अहमदनगर मधील आणि प्रसाद अण्णा या सांगलीतील ठेकेदारांसह शरयू इंडस्ट्रीज मधील वरिष्ठ अभियंता संतोष खोले मुख्य अभियंता महादेव भंडारे वरिष्ठ अभियंता संजय मुळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फॅब्रिक इंडस्ट्रीज व ऍक्युरेट इंजीनियरिंग अँड इरेक्शन यांच्यावतीने काम करणारे वसंत लोढा या अहमदनगर मधील आणि प्रसाद अण्णा या सांगलीतील ठेकेदारांनी
वेगवेगळ्या सरकारी व निमसरकारी कंपन्यांचे खोटे दाखले व सही शक्य असलेले कागदपत्रे सादर केली व शरयू इंडस्ट्रीज मधील वरिष्ठ अभियंता संतोष खोले, मुख्य अभियंता महादेव भंडारे, वरिष्ठ अभियंता संजय मुळे यांना हाताशी धरून पैशाचे अमिष दाखवले.
कोणतेही नवीन काम न करता जुन्या मशिनरी व साहित्यालाच नव्याने काम केल्याचे दाखवून कंपनीची एक कोटी 14 लाख 90 हजार 358 रुपयांची फसवणूक केली. त्यावरून वरील पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला लोणंद पोलीस तपास करत आहेत.
प्रकार धक्कादायकच; पण कसा उघड झाला?
विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार बऱ्याच दिवसापासून सुरू होता. सारेच अधिकारी एकमेकांशी संगनमत करून आपापला फायदा बघत होते. हे थोडेसे उशिरा लक्षात येताना सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. कागदपत्रे तपासत असताना संबंधित अधिकाऱ्यांची अकाउंट देखील तपासण्यात आली, तेव्हा संबंधित ठेकेदारांनी या अधिकाऱ्यांच्या खात्यावर अनेक मोठ्या रकमा हस्तांतरित केल्याचे दिसून आले.