दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील राहू येथे बिहारमधील एका परप्रांतीय मजुराचा अज्ञात व्यक्तींनी धारदार हत्याराने खून करून मृतदेह विहिरीत टाकला, तर गलांडवाडी येथे एकाने ग्राईंडरच्या साह्याने गळा कापून आत्महत्या केली. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. २४) राहु व गलांडवाडी या दोन गावात वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.
याबाबत यवत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गलांडवाडी येथे प्रमोद तुळशीराम शेलार यांच्या घरालगत असलेल्या खोलीत खडबड खडबड अवाज आल्याने तुळशीराम शेलार हे कसला आवाज येत आहे हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना विपुल रमेश गद्रे ( रा. ता. कर्जन जि.बडोदा गुजरात) यांनी ग्राईंडर चे साहयाने गळा कापून आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत प्रमोद शेलार यांनी यवत पोलीस ठाण्यात खबर दिली. तसेच राहू येथे भिमकुमार अनिल यादव (वय ३०, रा. जयपुर तहसिल मेंहदीया जि.अरवल राज्य बिहार) या व्यक्तीची कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी कारणावरून धारदार हत्याराने वार करून खुन करून त्याचा मृतदेह महादेव तुकाराम शिनगारे यांचे मालकीचे विहीरीत फेकून दिल्याची घटना घडली. याबाबत पोलीस पाटील सुरेश सोनवणे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात इसमांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.