शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर पोलिस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी गेल्या आठ दिवसात शिरूर शहर पोलिस स्टेशन हद्दीत राबविलेल्या अनोख्या संकल्पनेने शिरूरकरांची मने जिंकली आहेत.
शिरूर शहर व पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या चोऱ्या,वाहतुकीची समस्या मुलींची व महिलांची सर्रास होणारी छेडछाड हा चिंतेचा विषय बनला होता.सातत्याने यावर कुठे तरी आळा बसावा अशी नागरिकांची मागणी होती.याच दरम्यान जुन्या अधिकाऱ्यांना बदलून जाऊन नव्याने पोलिस निरीक्षक म्हणून संजय जगताप यांची दहा दिवसांपूर्वी नेमणूक झाली.
शिरूर पोलिस स्टेशन हद्द मोठी तसेच तालुक्याचे ठिकाण असल्याने तितकाच कामाचा ताण ही मोठा आहे मात्र स्वतः पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बदल घडवायचाच असा निश्चय केला. सूत्रे हाती घेतल्यानंतर “पायी गस्त” घालण्याचा निर्णय घेतला. ज्या ज्या ठिकाणी जास्त गर्दी होते अशा ठिकाणी स्वतः अधिकारी व अंमलदार यांना घेऊन पायी चालत शहराचा आढावा घ्यायचा. चुकीचे असेल तर तिथेच कारवाई करायची असा नियम देखील घातला.
शिरूर पोलिस स्टेशनला प्रथमच अशा अधिकाऱ्याने असा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर स्वतः कारवाई करत असल्याने नगरिक देखील अचंबित झाले आहेत.वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शाळा महाविद्यालय परिसरात विद्यार्थी,मुली यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कारवाई केली जात आहे. तर काळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर जोरात कारवाई होत असल्याने अनेकांनी धसकाच घेतला आहे. शनिवारी बाजार समितीच्या प्रवेशद्वारात होणारी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली होती मात्र यावर उपाय करत प्रथमच रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
फास्ट पोलिसिंग
शिरूर पोलिस स्टेशन येथे दयानंद गावडे यांनी त्यांच्या कार्यकाळात फास्ट पोलिसिंग करत स्वतः अनेकदा रस्त्यावर उतरून कारवाई केल्याचे अनेकांनी पाहिले आहे.तशीच कारवाई संजय जगताप यांच्याकडून होत असल्याने अनेकांनी समधान व्यक्त केले असून ही कारवाई नियमित करावी अशी मागणी केली जात आहे.
गेल्या आठ दिवसांत शिरूर पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाई करत गावठी दारू उद्धस्त केली आहे.दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींवर नुकतीच तडीपारीची कारवाई केली आहे.सोशल मीडियावर भाई गिरी करणाऱ्या आरोपींवर कारवाई करत यापुढे गुन्हेगारांना माफी नाही असा इशाराच दिला आहे.
शिरूर शहरात गेल्या आठ दिवसात झालेला बदल स्वागतार्ह असून पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या अनोख्या कामाच्या स्टाईलने शिरूर शहरात नागरिकांच्या चर्चेत आहेत.











