नाशिक – महान्यूज लाईव्ह
मनसे नेते व मनसेचे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांना नाशिकमधील सिन्नर जवळच्या समृध्दी महामार्गावर अडवले, त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला. यासंदर्भात कोणी तक्रार दिलेली नाही, मात्र पोलिसांनी तपासाला सुरवात केल्याचे सांगितले जात आहे.
शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. मनसे नेते अमित ठाकरे हे या महामार्गावरून गेल्यानंतर दोन ते तीन वाहनांतून कार्यकर्ते आले आणि त्यांनी केबिनच्या काचा फोडल्या आणि ते तेथून निघून गेले.
मनसे नेते अमित ठाकरे यांचा या आठवड्यात उत्तर महाराष्ट्राचा दौरा होता. त्यामध्ये त्यांनी नंदूरबार, धुळे, जळगावसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर शनिवारी ते नाशिकमधून परत मुंबईला निघाले.
सिन्नरजवळील समृध्दी महामार्गावरील टोलनाक्यावर त्यांची गाडी अडविण्यात आली. काही काळ ठाकरे यांना तेथे थांबावे लागले. फास्टटॅगच्या तांत्रिक बिघाडामुळे ही कार थांबविण्यात आली होती अशी माहिती मिळत असून त्यानंतर ठाकरे तेथून निघून गेल्यानंतर मनसेचे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही फोडाफोडी केली.