सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : राज्यामध्ये एक वर्षांपूर्वी शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आलेपासून भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांचा विकास कामांचा धडाका इंदापूर तालुक्यामध्ये गेली अनेक महिन्यांपासून सातत्याने पहावयास मिळत आहे.
सोमवारी (दि.24) भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील 4 गावांमध्ये रु.9 कोटी 14 लाखांच्या अनेक विकास कामांची भूमिपूजने संपन्न होणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हिंगणगाव येथे सकाळी 9 वाजता, शेटफळ हवेली येथे सकाळी 11 वाजता, वकीलवस्ती येथे दुपारी 12 वा., तक्रारवाडी येथे सायंकाळी 4 वा. विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे.
यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयीन इमारती, रस्ते, पेयजल योजना आदी विकास कामांचा समावेश आहे. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील हे ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधी दिला आहे. आगामी काळातही भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर तालुक्यामध्ये विकास कामांचा धुमधडाका चालूच राहणार आहे.