जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
भोर : निरा खोऱ्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळे आज (ता.20) एका दिवसामध्ये तब्बल सव्वा दोन टीएमसी पाणी चार धरणामध्ये जमा झाले, परंतु गेल्यावर्षी याच दिवशी जिथे चार धरणामध्ये 70% पाणीसाठा होता, तो यावर्षी मात्र 37 टक्क्यांवरच आहे.
दरम्यान आज शेतकऱ्यांच्या मोबाईलवर सोशल मीडियातून वीर धरण 100% भरले असून नीरा नदीतून केव्हाही पाणी सोडले जाईल अशा स्वरूपाची एक बातमी फिरत असून ती बातमी चुकीची आहे व अशा प्रकारची कोणतीही बातमी सध्या धरण क्षेत्रात नाही कारण धरण क्षेत्रात एवढा पाणीसाठा अद्याप जमा झालेला नाही.
तब्बल निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा पावसाळ्याच्या मध्यात असतानाही जमा झाल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. अर्थात गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडत असून भाटघर धरणाची काल संध्याकाळपर्यंतची जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पाणीसाठ्याची क्षमता 38.03% झाली आहे. भाटघर धरण क्षेत्रात 28 मिलीमीटर पाऊस पडला आहे.
निरा देवघर धरणाचा पाणीसाठा 42.95% वर पोहोचला आहे. वीर धरणात पावसाचे प्रमाण कमी आहे, या ठिकाणी फक्त सहा मिलिमीटर पाऊस पडला, परंतु या धरणातील पाणीसाठ्याची क्षमता आता 31.01% वर पोहोचली आहे. गुंजवणी धरण क्षेत्रावर मात्र पाऊस मुसळधार सुरू असून धरण क्षेत्रात पाण्याचा एवा देखील वाढला आहे. या धरण क्षेत्रातील पाण्यासाठी क्षमता आता 36.36% झाली आहे.
चार धरणामध्ये आज (ता. 20) सकाळपर्यंत 18.235 टीएमसी पाणीसाठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी तो पाणीसाठा 33.846 टीएमसी एवढा होता. त्यामुळे अजूनही पाण्याची येण्याची क्षमता ही निम्म्यापर्यंतच आहे. येत्या दोन दिवसात अजूनही मुसळधार पाऊस झाला, तर आश्वासक पाणीसाठा तयार होईल असे चित्र आहे.