दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : येथे महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या पालघर तालुक्यातील पर्यटकांच्या बसवर १५ जुलै रोजी दगडफेक करण्याची घटना घडली होती. या घटनेत वाई पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
दगड फेकीच्या घटनेत पर्यटकांच्या बसचे नुकसान झाले होते. तसेच तीन पर्यटक गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा तसेच जमाव जमवून नुकसान करण्याच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. या घटनेत गुरेबाजार झोपडपट्टीतील सागर सुरेश जाधव, अक्षय गोरख माळी, वसंत तारासिंग घाडगे व सारंग ज्ञानेश्वर माने यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यासंदर्भात पालघर जिल्ह्यातील एडवण येथील रहिवासी जितेंद्र तळे यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांच्याकडे या घटनेचा तपास होता. घटना घडली, तेव्हापासून महागणपती घाट परिसरात तणावाचे वातावरण होते.
संबंधितांचे पर्यटकांना नाहक त्रास देणे, स्थानिकांना दमदाटी करणे, असे प्रकार वाढले होते. बसवर झालेल्या दगडफेकीप्रकरणी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या सूचनेनुसार आयपीएस कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, आशिष कांबळे, तपास अधिकारी फौजदार सुधीर वाळुंज, श्रावण राठोड, गोरख दाभाडे, नितीन कदम यांचे पथक तयार करुन तपास सुरु करण्यात आला होता.
या पथकाने गणपती मंदिर परिसरातील कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या गुरेबाजार झोपडपट्टीत रात्रीच्या वेळी सापळा सापळा लावला. तेव्हा यात गुन्हे दाखल असलेले आणि पोलिसांना हवे असलेले चारही आरोपी अडकले. वाई पोलिसांनी त्या चौघांना जेरबंद केले आहे. या धडाकेबाज कारवाईचे वाईकर नागरिकांनी वाई पोलिसांचे आभार मानले आहेत .
वाई शांत शहर म्हणून ओळखले जाते. मात्र या शहराची शांतता विस्कळीत करण्याचे काही विघ्नसंतोषी लोक प्रयत्न करत असतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी सतत वाईकर जनतेतून मागणी होत असते. पर्यटक वाई शहरात आवर्जून भेट देत असतात. वाईचा ऐतिहासिक वारसा पहात असतात. वाईचे कौतुक करत असतात, परंतु काही लोकांच्या विघ्नसंतोषीपणामुळे गालबोट लागण्याचे प्रकार घडू लागले होते. त्यांच्या मुसक्या आवळण्याचे धाडसी काम केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.