पुणे -महान्यूज लाईव्ह
पुण्यातील एका घटनेने पुणेकरांची दुपारची व रात्रीचीही झोप उडवली. बहिणीला दोन जुळ्या मुली झाल्याने मुलींना दूध पाजून ठार मारले व बहिणीचाही खून केला अशी फिर्याद सन २०२० मध्ये पोलिसांनी घेतली नाही, म्हणून न्यायालयात धाव घेतलेल्या भावाच्या तक्रारीवर न्यायालयाने आदेश दिल्याने हडपसर पोलिसांनी खून, खूनाचा कट रचणे या कलमाखाली नवरा, सासू, सासरा, दीर या्ंच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हडपसर पोलिसांनी महिलेचा पती अतुल बाबासाहेब सूर्यवंशी, सासरा बाबासाहेब सूर्यवंशी, जयश्री बाबासाहेब सूर्यवंशी, दिर अमोल बाबासाहेब सूर्यवंशी (सर्व रा. हरपळेवस्ती, फुरसुंगी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, यासंदर्भात श्रीकृष्ण प्रताप लोभे यांनी फिर्याद दिली होती. त्यांची बहिण उर्मिला सूर्यवंशी हिचा मृत्यू व जुळ्या मुलींचा मृत्यू हे खून होते असा दावा लोभे यांनी न्यायालयात केला होता.
या घटना सन २०१९ व २०२० मध्ये घडल्या. उर्मिला यांना मुलगा पाहिजे म्हणून घरचे लोक त्रास देत होते. मात्र त्यांना जुळ्या मुली झाल्या. बाळंतपणानंतर सहा महिन्यांनी सासरी आलेल्या उर्मिला यांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी मुलींना दूध पाजून झोपवले, मात्र तरीही पती अतुल यांनी सात महिन्यांच्या सिध्दी नावाच्या मुलीला बाहेरून दूध आणून पाजले, त्यामुळे तिचा मृत्यू झाला, त्यानंतर ६ फेब्रुवारी २०२० रोजी नऊ महिन्यांची मुलगी रिध्दी हिलाही बाहेरील दूध आणून पाजल्याने तिचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.
त्याचवेळी उर्मिला यांना या मृत्यूबद्दल संशय असल्याने लोभे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली होती, मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे लोभे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यावरून हडपसर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक संदीप शिवले हे तपास करीत आहेत.
दरम्यान याच प्रकरणातील आणखी एक मुद्दा म्हणजे उर्मिला ही आय़टी कंपनीतील अभियंता असल्याचे दाखवून तिचा ५० लाखांचा टर्म इन्शुरन्स काढला व तिला फिरायला घेऊन जातो म्हणून कारमधून पौडला नेले, तेथे तिच्या गाडीला अपघात झाल्याचे दाखवले, त्यामध्ये उर्मिला हिचाही मृत्यू झाला, हाही खूनच असल्याचा दावा लोभे यांनी केला असून त्याचीही सध्या सुनावणी सुरू आहे.