ठाणे – महान्यूज लाईव्ह
मुंबई – नाशिक महामार्गावरील खडवली रेल्वे स्थानकानजिकच्या फाट्यावर कंटेनरने काळ्या पिवळ्या जीपला ठोकर दिल्याने तब्बल सहा जणांचा जीव गेला, तर नऊ जण गंभीर जखमी झाले. पडघा परिसरातील खडवली फाट्याजवळ हा अपघात झाला.
ठाणे जिल्ह्यातील पडघा परीसरातील विद्यार्थी व नोकरीसाठी, रोजगारासाठी दररोज मुंबई, कल्याणला जाणाऱ्यांपैकी काहीजण काळ्या पिवळ्या जीपमधून खडवली रेल्वे स्थानकाकडे निघाले होते.
मंगळवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास (एमएच०४-ई १७७१) जीपने हे प्रवासी निघाले असताना अचानक मुंबईकडे निघालेल्या कंटेनरने (एमएच४८ टी ७५३२) या जीपला धडक दिली व जीपला फरफटत दूर अंतरापर्यंत नेले. यात प्रज्वल फिरके, चैताली पिंपळे, रिया परदेशी, चिन्मयी शिंदे, संतोष जाधव, वसंत जाधव या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
तर या अपघातात वाहनचालक जावेद शेख याच्यासह चेतना जसे, जान्हवी वाळूंज, कुणाल भामरे, दिलीप विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने भिवंडीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान कंटेनर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.