राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड. : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीत शोगन ऑरगॅनिक्स, जे.पी. लॅबोरेटरीज, लाचेमी केमोग्स, असोसिएट अलाईड केमिकल्स व विश्वा लॅबोरेटरीज या पाच रासायनिक कंपन्यांवर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाचा ठपका ठेवत नुकतीच नोटीस बजावली असून कारवाईचे करण्याचे संकेत दिले आहेत.
दौंड तालुक्यात कुरकुंभ, पांढरेवाडी,पाटस, गिरीम या परिसरात कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील रासायनिक कंपनीकडून होत असलेल्या वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रासायनिक कंपन्यांकडून मानवाला घातक आणि हानीकारक असा कचरा व रासायनिक मिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता उघड्यावर सोडून देण्याचे प्रकार वाढत आहेत.
या रासायनिक कंपन्यांना प्रदूषणाबाबत कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याने मोठ्या प्रमाणात सांडपाणी व धोकादायक कचऱ्याबाबतचे प्रदूषण सर्रासपणे केले आहे. या कंपन्याकडुन सांडपाणी व धोकादायक कचऱ्याचे कायदेशीर नियोजन केले जात नाही.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी कुरकुंभ येथील शोगन ऑरगॅनिक्स, जे.पी. लॅबोरेटरीज, लाचेमी केमिकल, असोसिएट अलाईड केमिकल्स व विश्वा लॅबोरेटरीज या पाच कंपन्यांमध्ये भेट देत प्रदूषणाबाबत तपासणी केली.
यावेळी सदर कंपन्यांकडून प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून उत्पादन केले जात असल्याचे निदर्शनास आले. याबाबत या अधिकाऱ्यांनी प्रदूषणाबाबतचा कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयात सादर केला होता.
त्यानुसार पुणे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांनी गुरुवार (ता.१३) रोजी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील शोगन ऑरगॅनिक्स, जे.पी. लॅबोरेटरीज, लाचेमी केमोग्स, असोसिएट अलाईड केमिकल्स व विश्वा लॅबोरेटरीज या पाच कंपन्यांवर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहे.
या आदेशानुसार प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांनी नियमितपणे सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवावे आणि योग्य देखरेख करावी. कंपन्यांच्या मुख्य गेटवर प्रक्रिया न केलेले सांडपाणी किंवा विषारी सांडपाणी गळतीची बेकायदेशीर विल्हेवाट लावू नये. तसेच धोकादायक कचराबाबतचा वार्षिक नोंदणी अहवाल नियमितपणे कार्यालयात सादर करावा.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या संमती व नियम अटींचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. संबंधित कंपनीने प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची बँक गॅरंटी कार्यालयात जमा करावी असे आदेश जारी करण्यात आले आहेत. सदर आदेशावरील कृती अहवाल सात दिवसांच्या आत कार्यालयात सादर करण्याचे निर्देश संबंधित कंपन्यांना दिले गेले आहेत.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील शोगन ऑरगॅनिक्स, जे.पी. लॅबोरेटरीज, असोसिएट अलाईड केमिकल्स व विश्वा लॅबोरेटरीज या चार कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या लेड झोनमध्ये असून या कंपन्यांना प्रदूषणाबाबत अंतिम आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांचे पालन करण्यात कंपन्या अयशस्वी झाल्यास जल कायदा १९७४ आणि वायु अधिनियम १९८१ अनव्ये कडक कारवाई केली जाईल. अशी सूचना देण्यात आली आहे.
दरम्यान, कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्याकडून होत असलेल्या प्रदूषण बाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदने देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहेत. मात्र अधिकारी आणि कंपन्यांच्या आर्थिक संबंधामुळे अशा कंपन्यांवर ठोस अशी कारवाई केली जात नाही. तालुक्यातील काही बड्या राजकीय नेत्यांची या कंपनीमध्ये विविध कामांमध्ये ठेकेदारी आणि भागीदारी असल्याने तेही या प्रश्नांवर बोलत असून प्रदूषण करणाऱ्या या कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे.