दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील लिंगाळी येथील पारधी समाजाच्या एका अल्पवयीन मुलाला रस्त्यात अडवून त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मळद येथील दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कैलास धोत्रे व ज्ञानदेव विटकर (पुर्ण नाव माहीत नाही रा- मळद ता-दौंड जि.पुणे )अशी या आरोपींची नावे असुन रविवारी (दि .१६) दुपारी ३ वाजण्याच्या आसपास ही घटना घडली. याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,रोहीत रवि चव्हाण (वय १५) हा कटिंग करुन भाजीपाला घेऊन लिंगाळी चौकामधुन पायी चालत घरी जात असताना हे दोघे दुचाकीवरुन आले. त्यांनी कारण नसताना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली व ज्ञानदेव विटकर याने कमरेचा चाकू काढून डोक्यात मारला.
डोक्यातुन रक्त आल्याने तो जोरात ओरडल्याने ते दोघे मोटार सायकल वरुन तेथुन निघुन गेले. हा प्रकार जखमी अवस्थेत त्या मुलाने घरी आल्यावर आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्याच जखमी अवस्थेत रोहित व त्याच्या आई-वडिलांनी दौंड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीसांनी रोहीत यास औषध उपचारकामी मेडीकल यादी दिल्याने औषध उपचार करण्यात आले. या प्रकरणी नीलम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून त्या दोघांवर मारहाण करणे व व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.