बारामती: महान्यूज लाईव्ह
नीरा डाव्या कालव्याच्या व उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. जागोजागी शेतकऱ्यांनी याला विरोध करत आता हा प्रश्न तेवत ठेवला आहे. दोन दिवसापूर्वी काटेवाडी मध्ये अस्तरीकरणाच्या कामाला ठेकेदाराने सुरुवात करताच शेतकरी एकत्र होऊन त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी काम बंद पाडले. तर आज माळेगाव कॉलनी येथे देखील शेतकऱ्यांनी निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम बंद पाडले.
दरम्यान यासंदर्भात काटेवाडीतील शेतकऱ्यांची एक बैठक अधिकाऱ्यांनी घेतली होती. मात्र आज रातोरात शेतकऱ्यांनी काटेवाडीहून मुंबई गाठली.. आणि देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कानावर येथील शेतकऱ्यांची मनस्थिती घातली. यावेळी अजित पवार यांनी देखील शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला आणि हे काम आपल्या काळात नव्हे तर भाजप सरकारच्या काळात सुरू झाल्याची देखील कार्यकर्त्यांना माहिती दिली, मात्र येथील शेतकऱ्यांची परिस्थिती आणि अस्तरीकरणामुळे खरोखरच पाझर होत नाही हे शेतकऱ्यांनी निक्षून सांगितल्यानंतर, जिथे विरोध आहे तिथे एक काम थांबावे अशी सूचना अजित पवार यांनी देखील केली. अशी माहिती अजित पवार यांना भेटलेल्या शेतकऱ्यांनी महान्यूज ला दिली.
दरम्यान या ठिकाणी पाटबंधारे खात्याचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. सुरुवातीला या अधिकाऱ्यांनी हा प्रश्न मिटल्याचे सांगितले, मात्र शेतकऱ्यांनी हे चुकीचे असल्याचे सांगितले, तेव्हा अधिकाऱ्याने देखील गप्प राहणे पसंत केले आणि यावेळी अजित पवार यांनी या शेतकऱ्यांची तब्बल अर्धा तास चर्चा करून सर्व माहिती जाणून घेतली.