मुंबई : महान्यूज लाईव्ह
काल राष्ट्रवादीचे मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वाय बी चव्हाण सेंटर मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले. त्यानंतर आज विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाच पहिल्याच दिवशी दिवसभराचे कामकाज तहकूब झाल्यानंतर सर्व आमदार आता शरद पवारांच्या भेटीला आले, मात्र वाय बी चव्हाण सेंटर कडे निघालेल्या शरद पवार यांनी या सर्व आमदार राष्ट्रवादीच्या कार्यालयाकडे जाण्याची सूचना केली असे समजते.
अर्थात शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे विचारणा केली की, पत्रकार का जमले आहेत? त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिल्यानंतर शरद पवार यांना आमदार इकडे येणार आहेत याची कल्पनाच नव्हती असे लक्षात आले. काल देखील सर्व मंत्री अजित दादा तसेच प्रफुल्ल पटेल हे सर्वजण शरद पवार यांच्याकडे आले होते. शरद पवार यांच्याकडे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याचबरोबर आम्हाला पाठबळ द्यावी अशी विनंती केली, मात्र शरद पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती.
त्यानंतर आज दुपारी पुन्हा राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी आले आहेत आणि त्यामुळेच राज्यातही मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय? हे अजित दादांची खेळी आहे की भाजपची स्क्रिप्ट? असा देखील सवाल खुद्द राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते विचारू लागले आहेत. दरम्यान शरद पवार यांनी मात्र सर्व आमदारांना राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाण्याची सूचना केली.