ठेकेदाराकडून दर्जेदार रस्ते होत नसतील तर पदाधिकाऱ्यांनो ती कामे लगेच थांबवा..! आ.भरणे
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून राज्यात महायुती झाली आहे, त्यामुळे आता आपण टीका टिप्पणी न करता आपण विकासाचे राजकारण करण्याची गरज आहे, असल्याचे सांगत आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना चिमटा काढत सल्ला दिला आहे.
लाकडी (ता इंदापूर) येथे विकास कामांचे उद्घाटन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार भरणे म्हणाले की, या भागाचा महत्त्वाचा असलेला शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न केले, त्या प्रयत्नांना यश आले आहे. त्याचबरोबर गावातील महिलांच्या डोक्यावरील कायमचा हंडा उतरवण्याचे काम सुरू आहे.
परिसराचा विकास झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात विकासाबाबत जे राजकारण झाले त्याकडे लक्ष न देता गावचा विकास डोळ्यासमोर ठेवून गावातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन करत आगामी काळात होणारी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत, गावची ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास आपण गावच्या विकासासाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा आमदार भरणे यांनी केली.
त्याचबरोबर लाकडी परिसराच्या विकासासाठी रस्ते, पाणी आदी प्रश्नांचे कायमचे उत्तर आपण शोधल्याने गावाचा नावलौकिक वाढला आहे. गावातील आरोग्य उपकेंद्र असेल अथवा अंतर्गत रस्ते असतील यासाठीही निधी दिला गेला आहे. त्यामुळे कामे दर्जेदार करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. ठेकेदार कोणीही असो, चांगले काम करणार नसेल तर त्याचे काम तात्काळ थांबवा असे आवाहनही ग्रामस्थांना आमदार दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केले.
यावेळी प्रताप पाटील, सचिन सपकळ, श्रीमंत ढोले, द्रौपदा वणवे, बाळासाहेब खरमाटे, दादा वणवे, महेश वणवे, रायचंद्र वणवे, आप्पा ढोले, हरिचंद्र वणवे, काशिनाथ वणवे, संजय सांगळे, तुकाराम पवार यांच्यासह ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.