राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पेडगाव येथील भीमा नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर दौंड पोलीस व महसूल विभागाने छापा टाकून संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सात वाळू माफियांवर गुन्हा दाखल करीत तब्बल ४० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही माहिती दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
महेश उर्फ पप्पु कोथिंबीरे, सतोष उर्फ बंटी कोथिंबीरे (दोन्ही रा. श्रीगोंदा जि अहमदनगर), असिफ तांडेल, मुक्तार काझी (दोन्ही रा पेडगाव ता श्रीगोंदा जि अहमदनगर), अजित जठार (रा. खोरवडी वाघदरा ता दौंड,जि पुणे), सचिन शेजाळ, शहाजी कापसे (दोन्ही रा. वडगांव दरेकर ता दौड जि पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाळू माफियांची नावे आहेत.
मागे अनेक दिवसांपासून भीमा नदी पात्रात दौंड तालुक्यातील पेडगाव हद्दीत रात्रीच्या सुमारास जेसीबी पोकलेन च्या साह्याने बेकायदा वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे. त्याबाबत पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना माहिती मिळाल्याने दौंड तहसीलदार अरुण शेलार यांना याबाबत कळवले.
पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि तहसीलदार अरुण शेलार यांनी कारवाईसाठी सदर ठिकाणी महसूल व पोलीसांचे पथक तैनात केले. या पथकाने गुरुवारी (दि. १३) रात्री ९ वाजण्याच्या आसपास सुमारास भीमा नदी पात्रात छापा टाकला. यावेळी एक जेसीबी व पोकलेनचे साह्याने वाळूचे अवैधरित्या उत्खनन व वाहतुक सुरू असलेल्याचे निदर्शनास आले.
या पथकाने अंदाजे १० लाख किंमतीचा एक पिवळ्या रंगाचे जेसीबी मशीन (तीचा चॅसी नं. HAR30XXTJ 02582545) , अंदाजे ३० लाख किंमतीचा नंबर नसलेला एक पिवळया रंगाचे हयुंदाई कंपनीचे पोकलेन मशीन आणि ३० हजार किंमतीची सुमारे पाच ब्रास वाळु अशा एकूण ४० लाख ३० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस हवालदार सुभाष राऊत, महेंद्र लोहार, विनोद चव्हाण, नितीन बोराडे,पोलीस शिपाई रवींद्र काळे,अमोल देवकाते, पोलीस नाईक निखिल जाधव,चालक पोलीस उपनिरीक्षक पोपट जाधव तसेच तहसिलदार अरूण शेलार, मंडलाधिकारी दादासाहेब लोणकर, प्रकाश भोंडवे, अजित मोहीते, विनोद धांडोरे, तलाठी संतोष होले, कोतवाल पोळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणी देऊळगावराजे येथील मंडल अधिकारी दादासाहेब लोणकर यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने सात वाळू माफियांवर गौण खनिज उत्खनन व पर्यावरण संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.