कोल्हापूर – महान्यूज लाईव्ह
अभिनेता सुनिल शेट्टी याने टोमॅटोच्या वाढलेल्या दरावरून आम्ही टोमॅटो खाणं कमी केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली, त्यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सुनील शेट्टीला बाजारू कलावंत म्हणत जागतिक भिकारी असल्याचा आरोप केला.
गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्या महाग झाल्या आहेत, मात्र सगळीकडे चर्चा आहे ती टोमॅटोची.. टोमॅटोचे दर प्रतिकिलो १०० रुपयांपेक्षा अधिक वाढले आहेत. उत्तर प्रदेशात तर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्ता विक्रेत्याने टोमॅटोच्या वाढीव दरावरून सरकारवर टिका करण्यासाठी विडंबन करताना टोमॅटोच्या पहाऱ्यासाठी बाऊन्सर ठेवले. त्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटकही झाली.
आता सुनील शेट्टी हा चर्चेत आला आहे. सुनील शेट्टी याने आम्ही टोमॅटो खाणं कमी केल्याचं सांगताच सदाभाऊ खोत यांनी कोल्हापूरातील पत्रकार परीषदेत सुनील शेट्टी भीक मागायला आला, तर त्याच्या कटोऱ्यात सडकी टोमॅटो टाका असे सांगत सुनील शेट्टी हा बाजारू कलावंत असल्याची टिका केली.
खोत म्हणाले, हा सडक्या डोक्याचा असून तो जागतिक भिकारी आहे, शेतकऱ्याला कधीतरी एखाद्या भाजीपाल्याला चांगला दर मिळाला, तर त्याच्यासारख्या जागतिक भिकाऱ्यांच्या पोटात दुखते अशी टिका खोत यांनी केली.