पुणे महान्यूज लाईव्ह
लाचखोरीसंदर्भात दररोज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडी आणि सापळे रचलेले आणि त्यामध्ये अनेक जण रंगेहाथ सापडलेले दररोज दिसत आहेत. एवढे सगळे होऊनही लाचखोरांना मात्र काहीच फरक पडत नाही. लाज, अब्रू, शरम सगळी संपलेली आहे. त्यामुळे लाचखोरीत कोणी सापडला तर कुणालाच काय वाटत नाही अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे.
पहिली बातमी पुणे महानगरपालिकेची संबंधित आहे. पुणे महानगरपालिकेतील मीटर रीडर हा 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला. उमेश राजाराम कवठेकर हा चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागाकडे मीटर रीडर म्हणून काम करतो. कवठेकर याने परवानाधारक प्लंबर असलेल्या तक्रारदाराला पाणीपुरवठा विभागाकडून हरकत प्रमाणपत्र द्यायचे, त्याकरता या प्लंबर ने कर्वे रस्त्यावरील चतुशृंगी पाणीपुरवठा विभागात अर्ज केला.
तेव्हा कवठेकर याने प्लंबरला ना हरकत प्रमाणपत्रासाठी 25 हजार रुपयाची लाच मागितली. कंटाळून गेलेल्या प्लंबर ने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने पडताळणी केली असता कवठेकर याने त्याच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये आणि स्वतःसाठी पाच हजार रुपये असे 25 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून मंगळवारी 11 जुलै रोजी चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागात सापळा रचून कवठेकर याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. याचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करीत आहेत.
दुसरी बातमी पुण्यातीलच आहे. उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या पुण्यातल्या विद्युत निरीक्षण कार्यालयात ही घटना घडली. वरिष्ठ लिपिकाने आणि चालकाने 12 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन विष्णू गाजरे असे या वरिष्ठ लिपिकाचे नाव असून याच कार्यालयातील बाळू काशिनाथ बिडकर हा चालक असून या दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विद्युत ठेकेदारीचा परवाना मिळवण्यासाठी 29 वर्षीय एका अभियंत्याने विद्युत निरीक्षण कार्यालयाकडे अर्ज केला होता. मात्र परवाना देण्यासाठी सचिन गाजरे याने लाच मागितली. त्याची पडताळणी केली असता या दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विद्युलत्ता चव्हाण या करीत आहेत.