राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील यवत येथे पैशाच्या कारणावरून एका संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकणे अर्थात बहिष्कृत टाकण्याचा समाजविरोधी प्रकार घडला होता. या बहिष्कृत शिंदे कुटुंबाची बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी भेट घेत सविस्तर माहिती जाणून घेतली.
दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यवत येथील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या हिंदू नाथपंथी डवरी गोसावी समाजातील शोभाबाई राजाराम शिंदे यांनी दोन लग्न जमवल्याने पैसे मागितल्या कारणावरून दवडी नागपंथी गोसावी समाजाच्या जातपंचायतने त्यांना दोषी ठरवत ४५३ रुपयाचा दंड सुनावत संपूर्ण कुटुंबालाच समाजातून वाळीत टाकल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली होती .
याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात ९ पंचाविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे विविध समाजातील संतप्त प्रतिक्रिया उंटू लागल्या होत्या. या प्रकरणी बुधवारी (दि १२) बहिष्कृत केलेल्या शिंदे कुटुंबाची अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी भेट घेतली.
यावेळी भोईटे यांनी पीडित कुटुंबाशी घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर चर्चा करीत अधिक माहिती जाणून घेतली. एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करणे किंवा वाळीत टाकणे हा प्रकार अतिशय गंभीर आहे. असे प्रकार घडत असतील तर संबंधित व्यक्तींनी त्वरित जवळील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, संबंधित व्यक्तींच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच काही समाजात होणाऱ्या जातपंचायती बाबत कायदेशीर मार्गदर्शन आणि समाजातील वाईट चालीरीतीबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे. असे प्रकार रोखण्यासाठी समाजातील शिक्षित युवकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. असे मत अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी यावेळी व्यक्त केले. या प्रसंगी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.