दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : गावातील नदीपात्रातील वैकुंठ स्मशानभूमीनजिक शासनाने वाळू उपसा करू नये अशा आशयाचे निवेदन आज पसरणी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.
पसरणी येथे वैकुंठ भूमी पसरणी येथे काही ठेकेदार, महसूल विभागाकडून वाळू उपशासाठी चक्क भूमीपूजन करण्यात आलेले असून त्यांनी ग्रामस्थांना सदर ठिकाणी वाळू काढण्याबाबत माहिती दिली नाही. कृष्णा नदीचे उगमापासून ते विसर्जनापर्यंत हजारो किलोमीटर अंतरात फक्त पसरणी येथेच वैकुंठधाम या एकमेव ठिकाणी कृष्णा नदी दक्षिणोत्तर वाहते. त्यामुळे सदर ठिकाणावरती गावकऱ्यांची श्रद्धा असून त्याला धार्मिक महत्व प्राप्त झालेले आहे.
या ठिकाणी उपसा केला तर नदीचे पात्र बदलून ऐतिहासिक ठेवा असलेले हे नदीपात्र नाहीसे होऊ शकते. तसेच पसरणी ग्रामपंचायत अटल भूजल अभियानामध्ये सहभागी असून पाणी बचतीचे महत्व सांगून पाणी अडवणे व त्याच परिसरात त्यांचे पूनरूज्जीवन करणे हेही काम या अभियानाचे उद्दीष्ट आहे.
या ठिकाणी वैकुंठभूमी असल्याने ग्रामस्थ त्याठिकाणी अग्निसंस्कार कार्यक्रम करीत असलेने या ठिकाणी ट्रॅक्टरसह इतर वाहने नेणेसाठी वापर होत आलेला आहे. सर्व ग्रामस्थ व नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेने सदरचा ठेवा जतन करणे गरजेचा असलेने ग्रामसभेमध्ये चर्चा होऊन सदर ठिकाणी वाळू उपसा होऊ नये म्हणून महसूल विभागाशी पत्रव्यवहार केलेला आहे.
या ठिकाणी वाळू उपसा करण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी ही मागणी केली आहे. या ठिकाणी वाळू उपसा केल्यास दोन्ही बाजूच्या पिकावू जमिनी खचून वाहून जाण्याचा धोका निर्माण होऊन जीवित व वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे येथे कायमस्वरूपी वाळू उपशाला बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी स्वप्नील गायकवाड, उपसरपंच विशाल शिर्के, प्रताप महांगडे, सदाशिव महांगडे, अण्णा महांगडे आदीसह इतरही ग्रामस्थ उपस्थित होते.