मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्याच्या राजकारणातील पक्षफुटीचा व राजकारणाचा चिखल होण्याच्या घटनेचा तिसरा अंक लवकरच पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. आता यावेळी पक्ष फुटीचा धक्का काँग्रेसला सहन करावा लागण्याची शक्यता आहे. चार दिवसापूर्वीच देवगिरीवर तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांची काँग्रेसच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन बंद दाराआड महत्त्वाची चर्चा केली होती. तब्बल एक तास झालेल्या चर्चेत नेमका काय फॉर्म्युला ठरला, हे अद्याप उघड झाले नसले तरी काँग्रेसचेही काही आमदार पक्ष फुटीच्या मार्गावर असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर भाजपने दिल्याचे समजते. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेचा निर्णय घेऊन सरकार बरखास्त करून अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाऊ शकते. ज्याचा उपयोग येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप करण्याची तयारी करत आहे.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सरकार स्थापन करून भाजपला फायदा झालेला नाही, उलट जनमानसातील भाजपची प्रतिमा अधिकच मलिन झाली असल्याने, भाजपला सध्या एकनाथ शिंदे म्हणजे पिंडीवरील विंचू वाटत आहेत अशी चर्चा सध्या मुंबईतील मंत्रालय परिसरात असून, सद्य परिस्थितीत भाजप फक्त संधीची वाट पाहत असल्याची ही चर्चा आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनिकांमधूनच उमटू लागलेल्या प्रतिक्रियांमुळे एकनाथ शिंदे यांना त्यांच्या गटातील आमदारांनी जाब विचारल्याचे समजते. एकंदरीत अजित पवार यांच्या येण्यामुळे अनेक गणिते उलटी होऊन बसली असून, सरकार स्थिर असताना राष्ट्रवादीला बरोबर घेण्याची काय गरज होती असा सवाल एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार विचारू लागले आहेत. या सर्व परिस्थितीत एकनाथ शिंदे यांची कोंडी होत असून, आक्रमक झालेल्या एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपतींबरोबर दौरा देखील टाळला.
मुंबई महापालिकेच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांची मदत भाजपला होणार असल्याचे गणित असून आता मात्र एकनाथ शिंदे डोईजड होत असल्याने तसेच विधानसभा अधिवेशनापूर्वी अपात्रते संदर्भात निर्णय घ्यावा लागणार असल्याने देखील भाजपने ही खेळी खेळल्याचे सध्या बोलले जात आहे.
एकीकडे डोईझड होत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटावर दबाव ठेवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीचा गट बरोबर घेतला, तर दुसरीकडे भविष्यात वरचढ होऊ नये म्हणून राष्ट्रवादीवर देखील अंकुश ठेवण्यासाठी काँग्रेसमधील आमदारही या आघाडीत आणण्याचे भाजपच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सध्या मुंबई आणि परिसरात सुरू आहे. एकंदरीत जर काँग्रेसचे आमदार फुटले, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील पक्षांतराचे संपूर्ण वर्तुळ पूर्ण होईल अशी गमतीदार चर्चा देखील सध्या मुंबईत सुरू आहे.