संपादकीय
राष्ट्रवादीतील घडामोडीनंतर आता भाजप ॲक्शन मोडमध्ये आला आहे. एकीकडे शिंदे गटातही भांडणे सुरू झाली आहेत आणि दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी कमकुवत झाल्याचे चित्र महाराष्ट्रात असतानाच ज्या महाविकास आघाडीच्या मजबुतीमुळे भाजपला स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणे अवघड होत होते, त्याचा मार्गाचा मोकळा झाला आहे. त्यामुळे ज्या निवडणुका गेले काही महिने पुढे टाळल्या जात होत्या, त्या आता लागलीच होतील तशा स्वरूपाची चर्चा आता सुरू झाली आहे.
भारतीय जनता पक्षाला ज्या गोष्टीची इतक्या दिवस आतुरता होती, ती गोष्ट आता भारतीय जनता पक्षाच्या मनासारखी झाली असून सहकार आणि इतर ठिकाणी भाजपला शिरकाव करणं आता सहज शक्य होणार आहे. 2014 नंतर भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मांड रोवली आणि आपल्याच सहकारी असलेल्या शिवसेनेला दूर करत एकहाती सत्तेचे समीकरण गाठण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले, तेव्हाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लक्षात अनेक गोष्टी यायला यावयास हव्या होत्या.
राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कालच्या शक्ती प्रदर्शनात दादा किंवा साहेब याचीच चर्चा जाणवत असली, तरी प्रत्यक्षात यातून फायदा भारतीय जनता पक्ष झाला आहे. आसाममध्ये आसाम गण परिषदेबरोबर युती केल्यानंतर संपूर्ण आसाम राज्य ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाला जेवढा काळ लागला, त्यापेक्षा कमी काळ हा पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात लागलेला आहे. अंधेरीतील निवडणुकीपासून ते कालपरवाच्या राजकीय परिस्थितीपर्यंत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातील लढाई अवघड वाटत होती, मात्र आता भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अजित पवार यांच्या बंडाच्या स्वरूपाने सोपी करून ठेवलेली आहे.
आता काँग्रेसचे निम्मे आमदार फोडले की हे संपूर्ण राज्य आपले असे म्हणायला भारतीय जनता पक्ष मोकळा होणार आहे. त्यामुळेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तसेच महापालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली तर आता आश्चर्य वाटायचे कारण नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपुरतेच शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा पवार गट भारतीय जनता पक्षाने हाताशी धरला आणि विधानसभेच्या वेळी प्रत्येकाला स्वतंत्र लढायला लावले तर तेही आश्चर्य वाटायला नको.
कालपरवापर्यंत राज्यातील परिस्थिती ही भारतीय जनता पक्षाच्या या फोडाफोडीच्या राजकारणाला विटलेली जनता आणि कंटाळलेली जनता असेच होते. भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला वैतागून महाविकास आघाडीकडे मतदारांचा कल अधिक वाढत होता. हे लक्षात घेत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा अनेकांच्या पाठीशी लावला हेही महाराष्ट्राला माहित आहे, मात्र राजकीय महत्त्वकांक्षेपोटी आता प्रत्येक पक्षाची शकले होऊ लागल्याने या पुढील काळात एकसंघ भारतीय जनता पक्षाला हे राज्य ताब्यात घ्यायला वेळ लागणार नाही आणि हेच आजच्या घडीचे राजकारणाचे सार आहे.
लोकशाहीत पूर्वी पक्षांतर व्हायचे. घाऊक पक्षांतरही झालेले अनेकांनी पाहिले आहे. परंतु पक्षांतराऐवजी थेट पक्षच ताब्यात घेण्याचे प्रकार गेल्या वर्षात जे सुरू झाले आहेत, त्याची महाराष्ट्रातील स्थिती लक्षात घेता लोकशाही आता नावालाच राहिली आहे, असे जे कोणी गळे काढत आहेत ते अगदीच चुकीचे नाही. गंमत म्हणजे महाराष्ट्रात आता पक्ष नाही, तर गट निवडणुकीच्या काळात भिडतील आणि भारतीय जनता पक्ष मात्र एक संघपणे निवडणुकांना सामोरे जाईल, त्यावेळी भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता संपूर्ण महाराष्ट्रात असेल हे सांगायला आता ज्योतिषाची गरज उरणार नाही.
सोलापूरचे एकहाती साम्राज्य हातात ठेवणाऱ्या मोहिते पाटलांपासून विखे पाटलापर्यंत आणि लातूरच्या देशमुखांपासून ते बारामतीच्या पवार कुटुंबापर्यंत आता इथून पुढच्या काळात संपूर्ण जिल्हे ताब्यात फक्त आमच्याच असे आता कोणी म्हणू शकणार नाही, अशी परिस्थिती भारतीय जनता पक्षाला करायची आहे. य मोहिमेत त्यापैकी फक्त पवार कुटुंब उरले होते. आता तिथे ही परिस्थिती उरणार नाही, अशी तजवीज भारतीय जनता पक्षाने करून ठेवली आहे. राज्यातील अस्मितेचे राजकारण परंपरागत तयार करून ठेवणाऱ्या शेवटच्या बलाढ्य विरोधकाची ताकद क्षीण करण्याचा प्रयत्न भाजपने केला असून या पुढील काळात आता रखडलेल्या निवडणुका लवकरच होतील असे समजायला हरकत नाही.