सातारा – महान्यूज लाईव्ह
अजित पवारांनी उचललेल्या या पावलांना बंड म्हणायचं की तुमचा आशिर्वाद? असा अनपेक्षित प्रश्न एका पत्रकाराने विचारला आणि शरद पवार भडकले.. ते म्हणाले, मी जाहीरपणे पक्षाच्या बांधणीसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालो असताना तुमच्यासारखाच एखादा क्षुद्र बुध्दीचा व्यक्ती पत्रकार परिषदेमध्ये आशिर्वाद हा शब्द वापरू शकतो. तुम्ही पत्रकारीतेचा दर्जा खराब करू नका अशा शब्दात पवारांनी पत्रकाराला खडसावले.
साताऱ्यात ही पत्रकार परीषद झाली. कराडमध्ये प्रितीसंगमावर जाऊन आल्यानंतर पवार हे साताऱ्याला पोचले. तेथे मेळाव्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी यापुढील रणनितीची माहिती दिली. आपण राज्यव्यापी दौरा करणार असून महाराष्ट्रभर फिरणार आहे, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आपल्यासोबतच आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
तेव्हा पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना भेटल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर पवार म्हणाले, अजित पवार परके नाहीत. मात्र अजित पवार म्हणजे पक्ष नाही. सुप्रिया तीन वेळा तिकडे गेली. याचा अर्थ तिने चुकीचे काम केले असे नाही. आम्ही सोबत काम केले आहे, अशावेळी मतभिन्नता काय आहे हे जाणून घेण्याचे काम कोणी सहकारी करीत असेल, तर ते चुकीचे नाही.