बारामती – महान्यूज लाईव्ह
अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि इकडे बारामतीत सुरवातीला जल्लोष, मग शरद पवारांच्या पत्रकार परीषदेनंतर मौन असे विविध प्रकार रविवारी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांनीही अनुभवले. त्यातच काहींनी देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्य चे बॅनर लावले.. मग त्यापाठोपाठ फक्त अजितदादांचा बॅनर लागला आणि त्यात शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांचे छायाचित्र नव्हते, मग बारामतीत भलतीच चर्चा सुरू झाली..
दोन दिवसांत हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागले असतानाच आज पहाटे बारामतीच्या विविध भागात सात बॅनर लागले. हे बॅनर विविध भागांत लागले आहेत.महात्मा फुले चौक, फलटण रस्ता, कसबा चौक, ढवाण पाटील चौक, श्रीरामनगर चौक, पंचायत समितीसमोरचा चौक अशा ठिकाणी हे बॅनर लागले आहेत.
या बॅनरवर मात्र अजितदादांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांचे छायाचित्र कार्यकर्त्यांनी लावले आहे. यामुळे पुन्हा एकदा शहरात चर्चा सुरू झाली.
अर्थात रविवारी जेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बारामतीकरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बहुसंख्य बारामतीकर दादा किंवा साहेब यापेक्षा उत्तर देताना दादा आणि साहेबही.. तसेच पवार कुटुंबिय.. अशीच उत्तरे देताना दिसून आली होती. त्याचाच हा परिणाम असावा.. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी संपूर्ण पवार कुटुंबच हे त्यांच्यासाठी महत्वाचे असेच यातून अधोरेखित होत आहे.