सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार आता सरकारमध्ये शिंदे फडणवीसांसह उपमुख्यमंत्री बनले आहेत. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अद्याप याविषयी थेट काही सांगितले नसले, तरी ते अजितदादांसोबत असतील याची खूणगाठ कालपासूनच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी बांधली आहे. एकूणच ज्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि सत्ताधारी आमदार म्हणून भरणेंना विरोध करत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजप गाठली, त्याच भाजपबरोबर आता राष्ट्रवादी सत्तेत आहे. त्यामुळे इंदापुरात आता पुढे काय होणार? हा प्रश्न काल दुपारच्या शपथविधी इंदापूर तालुक्यात प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांपुढे होता.
एका वर्षावर विधानसभा निवडणूक आहे आणि दुसरीकडे अजित पवार तर आता सत्तेत आहेत. दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे खंदे समर्थक आहेत हे सर्वांनाच माहित आहे, अशा परिस्थितीत इंदापूर विधानसभेचा उमेदवार कोण? हा प्रश्न सहाजिकच निर्माण होणार आहे आणि अशावेळी जर सत्तारूढ आमदाराला ही निवडणूक लढण्याची संधी मिळाली, तर भाजपने गेले दोन वर्ष जी मेहनत घेतली आहे त्याचे काय होणार? हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
ज्या दत्तात्रय भरणे यांना विरोध करत शिंदे यांची शिवसेना इंदापूर तालुक्यात निर्माण झाली ते पदाधिकारी आता काय करणार? त्यांना सत्तेचा अवकाश कसा मिळणार? हा देखील प्रश्न कालपासून उपस्थित केला जात असून मागील विधानसभा निवडणुकीवेळी ज्या प्रवीण माने यांचे नेतृत्व पुढे येत होते, त्यांना या निमित्ताने नवी संधी निर्माण होते का? हा देखील औत्सुक्याचा भाग आहे.
आता इंदापूर तालुक्यात सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते कोण?
इंदापूर तालुक्यात ज्या ज्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांचे गावभेट दौऱ्याचे नियोजन होत होते, त्या त्या वेळी दत्तात्रय भरणे यांचे खंदे समर्थक त्यांच्यासोबत आघाडीवर असायचे. आता या पुढील काळात सुप्रिया सुळे यांच्यासोबत कोणते कार्यकर्ते फिरणार? हे देखील कालपासून बोलले जात आहे. अर्थात येत्या काही दिवसात त्याची उत्तरे मिळतील, मात्र मग या निमित्ताने भाजपचा इंदापूर तालुक्यातील उमेदवार हा लोकसभेचा उमेदवार ठरणार का? हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
इंदापूर तालुक्यात आजही आजी-माजी आमदारांमध्ये फार मोठा गॅप नाही. अशा परिस्थितीत राज्यातील सध्याचे सत्तेचे समीकरण कार्यकर्ते आणि जनतेला कसे पटणार आणि ते आपल्याच बाजूने झुकवण्यात कोण यशस्वी होणार? यावर या पुढील विजयाची गणिते अवलंबून असणार आहेत. मात्र एकूणच राजकारणाचा झालेला चिखल इंदापूर तालुक्यात मात्र सर्वांसाठीच अडचणीच्या समीकरणाचा भाग असेल.