विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
अजित पवार यांच्या रविवारी झालेल्या शपथविधीनंतर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना राजकारणात येऊन चूक झाली का?अशी भावना मनात येत आहे. सध्या जे सुरू आहे ते चुकीचं आहे असं वाटतं. पण पक्ष जरी फुटला तरी आम्ही लढत राहणार आहोत. अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
अजित पवार आणि माझं नात हे व्यक्तिगत आणि भावनिक नातं आहे. राजकारण बाजूला ठेवले, तर नक्कीच मी भावनिक झालो आहे. ते माझे काका आहेत आणि त्यांनी अनेक वेळा मला साथ दिली आहे.
अजित पवार जाणार हे वाटलं नव्हतं. मात्र भाजप राष्ट्रवादी पक्ष फोडणार हे काहीसं लक्षात आलं होतं. पण ही संघर्षाची वेळ आहे. ५ तारखेला आम्ही सर्व आमदार एकत्र येणार होतो. आताही ५ तारखेला मुंबईला राष्ट्रवादीची बैठक शरद पवार यांनी बोलावली आहे. त्या बैठकीला आम्ही तिथे असणार आहोत. असंही रोहित पवार म्हणाले आहेत.
लोक आपली खुर्ची टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातच सगळे गुंतून आहेत. जनतेच्या प्रश्नांविषयी बोललं गेलं पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. त्यामुळे मनात विचार येतो की, राजकारण करायचं की नाही? पण एक गोष्ट मनात कायम आहे. महाराष्ट्र लढत राहिलेला आहे. महाराष्ट्राच्या रक्तात लढणं आहे. त्यामुळे तोच विचार पुन्हा बळ देतो असंही रोहित पवार म्हणाले आहेत.