विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ उपस्थित होते.
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत. घड्याळ चिन्हावरच आम्ही निवडणुका लढणार आहोत. देशपातळीवरील सध्या जी परिस्थिती आहे. त्याचा विचार केला असता विकासाला महत्व दिले पाहिजे. हे सर्व सहकाऱ्यांचे मत होते. त्यामुळे आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत.
आज आम्ही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.त्यामध्येही काही सहकाऱ्यांना संधी मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा कारभार जो चालू आहे. ते पाहता अतिशय मजबुतीने देश चालवण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. सध्या विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यातून काहीही हाती लागत नाही. मी विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. पण शुक्रवारी मी त्याचा राजीनामा दिला. माझी भूमिका मी कार्यकर्त्यांसमोर मांडली होती.
गेल्या २४ वर्षांपासून पक्ष वाढवण्यासाठी प्रफुल्ल पटेल,छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांनी काम केलं.यापुढे तरुणांसाठी काम करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.गेल्या सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो होतो.तेव्हासुद्धा विकासाचा एकमेव मुद्दा पाहून आम्ही निर्णय घेतला होता.आताही याच मुद्द्यावर आम्ही हा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक घटकाला न्याय देणं गरजेचं आहे.आम्हाला अनेक वर्षांचा प्रशासनाचा अनुभव आहे.त्याचा उपयोग सरकारला होईल.सोबतच पक्ष अधिक मजबुतीने पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. असं अजित पवार म्हणाले.