राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह बंड करीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेत सहभागी झाले. राज्याच्या राजकारणात हा मोठा भूकंप मानला जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
अजित पवार यांच्या बंडानंतर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. याचे पडसाद आता ग्रामीण भागातील राजकारणावरही पडू लागले आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर दौंड राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेते सध्या कात्रीत सापडले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जायचे, की राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जायचे त्याबाबत त्यांच्यात संभ्रम अवस्था निर्माण झाल्याचे चित्र आहे. दौंडचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश थोरात म्हणाले की, याबाबत सविस्तर माहिती घेतली नाही सविस्तर माहिती घेतल्यानंतर निर्णय घेतला जाईल.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुटला नाही किंवा त्यांच्यात गटतट पडले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस हे कुटुंब अजून एकत्रच आहे. त्यामुळे कोणाच्या सोबत जायचं हा प्रश्नच उद्भवत नाही.
दुसरीकडे दौंड शुगरचे संचालक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या समर्थकांनी मात्र अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याने फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आज झालेल्या राज्यातील राजकीय भूकंपानंतर समभ्रम आणि प्रचंड अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. मात्र, येत्या काही दिवसांतच दौंडचे हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असतील की, राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जातील हे स्पष्ट होईलच.
मात्र दुसरीकडे भाजप आमदार राहुल कुल यांच्या गटात मात्र आनंदाचे वातावरण झाल्याचे जाणवत आहे. त्यांना अजित पवारांच्या बंडामुळे उत्साहाच्या गुदगुल्या होत असल्याचे चित्र आहे. सध्या सोशल मीडियावर भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडींवर एकमेकांवर खिल्ली उडविली जात असल्याचे चित्र आहे.