बारामती : महान्यूज लाईव्ह
आज पहाटे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा नजीकच्या झालेल्या अपघातात ज्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, त्यामध्ये बारामतीतील कन्येचा देखील समावेश आहे. तिच्यासह तिच्या कुटुंबातील तिचे पती व मुलगी हे तिघेजण या अपघातात दगावले आहेत. विधी शाळेत मुलाच्या प्रवेशासाठी गेलेल्या आणि तिथून परतत असलेल्या या तिघांवर काळाने झडप घातली आहे. त्यामुळे बारामतीवरही शोककळा पसरली आहे.
बारामतीच्या वकील संघटनेचे माजी अध्यक्ष एडवोकेट अमर काळे यांच्या भगिनींचा यामध्ये समावेश आहे. तसेच मेहुणे व भाचीचा देखील यामध्ये समावेश आहे. भाची डॉक्टर होती. अपघातातील बहुसंख्य मृतदेह हे ओळखण्याच्या पलीकडचे असल्यामुळे डीएनए टेस्ट करूनच मृतदेहांची ओळख पटवून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अॅड. अमर काळे या घटनेची माहिती मिळतात तातडीने तिकडे रवाना झाले आहेत.
अमर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात त्यांची सख्खी बहीण कांचन गंगावणे, दाजी कैलास गंगावणे आणि भाची ऋतुजा गंगावणे हीचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत झालेल्या लोकांच्या मृतदेहाची ओळख पटत नाही. त्यामुळे कदाचित डीएनए टेस्ट करावी लागेल असे काळे यांनी सांगितले. सरकारी यंत्रणा सध्या काम करीत आहेत. घटनास्थळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पोहोचल्यानंतर ते निर्णय घेतील आणि त्यांचा निर्णय झाल्यानंतर मृतदेह आमच्या ताब्यात देणार आहेत असे त्यांनी सांगितले.