राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गावांमध्ये जातीधर्माच्या नावाखाली दहशत माजवण्याचे पेव फुटले आहे. अलीकडे मिसरुड न फुटलेली पोरं भरचौकात बेकायदा जमाव जमवून गर्दी करतात आणि तलवार घेऊन, नाहीतर हातात मिळेल त्या हत्यारांनी मारामारी करुन दहशत माजवतात, त्यातून सामाजिक शांततेचा तर भंग होतोच आणि सामाजिक सलोखाला ही गालबोट लागते. या वाढत्या घटनांमुळे सध्या दौंड तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
धर्माची हवा डोक्यात शिरलेल्या या पोरांना ना पोलीसांचा धाक, ना कायद्याचा धाक.. दौंड तालुक्यातील पाटस येथे दोन दिवसांपूर्वी व्हाट्सअपला वादग्रस्त स्टेटस ठेवल्याचा आरोप करीत एका अल्पवयीन मुलाला भर चौकात बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. सोशल मीडियावर मारामारीचा व्हिडिओ आणि हे वादग्रस्त स्टेटस व्हायरल झाल्याने यवत पोलिसांनी या प्रकरणी वादग्रस्त स्टेटस ठेवल्या प्रकरणी आणि मारहाण केल्याप्रकरणी बारा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी हे प्रकरण वेळीच हाताळल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात असली, तरीही सध्या तरुणांमध्ये होत असलेल्या या प्रकारांमुळे पालकांची डोकेदुखी तर वाढलीच, मात्र पोलीसांचीही मोठी डोकेदुखी वाढली आहे. सध्या तरुणांच्या हातात असलेल्या मोबाईलवर आता त्यांचाही ताबा राहिला नाही. सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण राहिले नसल्याने सोशल मीडिया हा आपल्याच हातात असल्याची प्रत्येकाची भावना होत चालली आहे.
यातूनच वाटेल ते स्टेटस ठेवणे, वाटेल ते कमेंट करणे आणि वाटेल ते चॅटिंग करणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत आणि यातूनच जातीय व सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे. सामाजिक वातावरण दूषित होत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे. याचं किंचितही भान राहिले नाही. असे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
काही महिन्यांपूर्वी वरवंड येथेही कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांच्या टोळक्यांच्या दोन गटात भरचौकात हातात तलवारी घेऊन मारामारी केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतरही पालकांनी काहीच बोध घेतला नसल्याचे दिसून येत आहे. राजकीय पुढारी आपल्या पाठीशी असल्याच्या भ्रमात राहून सध्या ही तरुणाई दिशाहीन व भरकटत चालली आहे. गाव पुढारी आणि काही कट्टरवादी धार्मिक संघटनांच्या नादी लागून ही तरुणाई आपले शैक्षणिक आयुष्य बरबाद करीत आहेत आणि आई-वडिलांनी त्यांच्या भविष्याचं करिअरचं पाहिलेले उज्वल स्वप्न क्षणात धुळीस मिळवत आहेत.
सध्या विद्यालय, शाळा, कॉलेज सुरू असल्याने शाळेच्या आवारात आणि बसस्थानकावर टवाळखोर मुलांचा घोळका वावरत आहे. दुचाकीवर ट्रिपल सीट बसुन हॉर्नचा कर्कश्श आवाज करत, अश्लिल हावभाव करत शाळा सुटायची आणि भरायच्या वेळेत हे बिनधास्त फिरत आहेत. या तरुणांना वाचवण्यासाठी किंवा तडजोड करण्याच्या भूमिकेने आलेल्या पोलीस ठाण्यात येणाऱ्या या गाव पुढाऱ्यांनाही त्याच भाषेत उत्तर देण्याची पोलिसांनी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.
सोशल मीडियावर होणारे वाद आता चौकाचौकात होऊ लागले आहेत. असे प्रकार केडगाव, यवत, पाटस या ग्रामीण भागातही घडू लागले आहेत, ही चिंतेची बाब असून विचार करण्याची आवश्यकता आहे. कायदा सुव्यवस्थेला कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न करीत असेल, तर पोलिसांनी आता मुळमुळीत भूमिका न घेता पोलीस स्टाईलने खाकीचा धाक दाखवण्याची गरज आहे. या तरुणाईला वेळीच आवर घातला पाहिजे अन्यथा अशांचा उच्छाद स्वतः च्या कुटुंबाला, गावाला, समाजाला, नव्हे राष्ट्राच्या एकात्मेताला ही मारक ठरणार हे मात्र नक्की.