दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील एक हजार फुट उंच डोंगराच्या २०० फुट खोल दरीत ३० ते ३५ घरांची वस्ती असलेले माडगणी हे गाव आहे. या या गावाला गेल्या अनेक वर्षापासून येणे जाण्यासाठी रस्ता नाही.
तेथील ग्रामस्थांना आरोग्य सुविधेबरोबर शासकीय योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व घरोघरी नळपाणी योजना सात पिढ्यात मिळाली नसल्याची उपरोधिक टीका येथील नागरिक करत आहेत.
एकीकडे वाई तालुक्यातील शहरांमध्ये व अनेक गावात अगदी गल्लीबोळ्यातील रस्ते चकाचक होताना पाहायला मिळत आहेत, पण दुर्गम भागातील गावाकडे दुर्लक्ष का? असं गावातील नागरिक विचारत आहेत. गावात सारी सायकल जात नाही. या गावाच्या चारी बाजूंनी घनदाट जंगल व डोंगर आहेत. याच डोंगरांच्या २०० फुट खोल दरीत गेल्या सात पिढ्यांपासून अनेक संकटांचा सामना करत येथील नागरिक आपले आयुष्य जगत आहेत.
या डोंगरावर पावसाळ्यात अतिवृष्टी अथवा ढगफुटी झाल्यास डोंगराचा काही भाग ढासळल्यास लवकर मदतही पोचणार नाही अशी अवस्था आहे मागील वर्षापूर्वीच जोर मध्ये डोंगर कोसळून अनेक घरे गाडली गेली. ती अवस्था टाळायची असेल, तर तातडीने रस्ता करणे गरजेचे आहे. एखादा माणूस आजारी पडला तर त्याला दवाखान्यात नेण्यासाठी डालग्यात घालून डोंगरातील पाऊलवाटांनी रस्ता शोधत जावे लागते. .