बारामती : महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील मुढाळे येथील हायस्कूलपासून लोखंडवाडीपर्यंतचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू असलेला रस्ता गेली दोन वर्ष सुरूच आहे. खरे तर हे काम 2022 मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होतं, परंतु हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे आणि त्यामुळेच लोकांमध्ये नाराजी आहे.
मुढाळे (ता. बारामती) येथील या रस्त्याच्या कामाकडे ठेकेदारापासून अधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांचेच दुर्लक्ष असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये आहे. येथील संग्राम मिंड यांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता मंजूर झाल्यानंतर चार किलोमीटर रस्ता 31 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.
तशा प्रकारचा मुदतीचा करारनामा निविदेत होता. मात्र आतापर्यंत झालेल्या कामाचा दर्जाही योग्य नाही आणि दुसरीकडे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या हरकती आहेत. या परिस्थितीमध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी हे काम तातडीने मार्गी लागावे अशी स्थानिकांची मागणी आहे.
दोन कोटी तीस लाख रुपयांचा हा रस्ता असून हा रस्ता वेळेत पूर्ण व्हावा. या रस्त्याच्या मंजुरीपासून ते आत्तापर्यंत आम्ही पाठपुरावा करीत आहोत, स्वतः विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी देखील या कामाची पाहणी करून तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र याकडे होणारे दुर्लक्ष अक्षम्य असल्याचे संग्राम मिंड यांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून काम रखडलेले असून कामाचा दर्जा राखला जात नाही. किरकोळ कारणावरून दोन वेळा चालू कामातील मशिन अन्य ठिकाणी नेल्याने काम रखडले. पावसाळ्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे जिकिरीचे होणार आहे असे त्यांनी सांगितले.