राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर अर्थात पाटस ते बारामती रस्त्यालगत दौंड तालुक्यातील रोटी हद्दीत असलेल्या वनक्षेत्रात वन विभागाकडून एक दिंडी एक वृक्ष या उपक्रमाद्वारे नुकतीच लागवड केलेली विविध रोपांची झाडे वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाण्याअभावी जळून चालली असल्याचे चित्र आहे.
दौंड तालुका वन विभागाकडून पाटस ते बारामती रस्त्यावर संत तुकाराम महाराज पालखी महामार्गलगत १७ जून रोजी ‘एक दिंडी एक वृक्ष’ हा उपक्रम राबवून विविध प्रकारची ३५० रोपांची वारकऱ्यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा कार्यक्रम वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत हा उपक्रम मोठ्या थाटामाटात केला होता.
मात्र अवघ्या दहाच दिवसात वन विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे व हलगर्जीपणामुळे मोठ्या थाटामाटात राबवलेला हा उपक्रम केवळ एक फार्स ठरला आहे. विविध प्रकारची लागवड केलेली ही रोपे सध्या पाण्याअभावी जळून गेली आहेत. या ठिकाणी फक्त खड्डेच दिसून येत आहे. अत्यंत दयनीय अवस्था सध्या या रोपांची झाली आहे.
या रोपांना संरक्षण देणारी जाळी बसवण्यात आली नाही. रोपांच्या देखभालीकडे तालुक्यातील वन कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली आणि पावसाच्या भरवशावर लागवड केलेली रोपे जळून चालली. पालखी सोहळाच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या या कार्यक्रमानंतर या ठिकाणी कर्मचारी फिरकले नसावेत.
पुढील वर्षाच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी लागवड करण्यात आलेल्या या रोपांची वाढ होऊन या ठिकाणी विविध हिरवीगार झाडे, सौंदर्याने नटलेला परिसर बहरेल असे चित्र दिसेल अशी अपेक्षा होती. मात्र हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे संत तुकाराम महाराज पालखी महामार्गलगत असलेल्या हा नैसर्गिक सौंदर्याचा ठेवा जपणूक करण्यात वनविभाग कमी पडला आहे.
लाखो रुपये खर्च करून शासन एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देत हजारो रोपांचे वृक्षारोपण करते, मात्र वृक्षारोपणानंतर त्याची योग्य ती दक्षता घेतली जात नाही, त्यामुळे लावलेली हजारो झाडे जळून जातात. दरम्यान,वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ठोस अशी कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी वनप्रेमींकडून होत आहे.