राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : पाटस ते दौंड अष्टविनायक रस्त्यावर भरधाव वेगाने कार ने दुचाकीला धडक देऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. त्यानंतर संतप्त जमावाने ही कार पेटवून दिली. या प्रकरणी नऊ जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
पाटस ते दौंड अष्टविनायक मार्गावर पाटस पोलीस चौकीच्या हद्दीत बिरोबावाडी जवळ शनिवारी (दि.२४) सकाळी साडे ते साडेआठच्या आसपास ऑडी कंपनीच्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक देऊन अपघात केला होता. या अपघातात नेहल बाळासाहेब गावडे या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी पोलिसांनी कार चालक अविनाश घोलप (रा.बिरोबावाडी ता.दौंड,जि.पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करीत शनिवारी ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर दुपारी संतप्त ग्रामस्थांनी बेकायदा जमाव जमवुन अष्टविनायक मार्गावरील ही अपघातग्रस्त ऑडी कंपनीची कार पेटवून दिल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी मयुर अंकुश गावडे, मनोज उर्फे मुन्ना अजिनाथ घटकळ , संजु विलास वायाळ , रोहन मुकेश गावडे , सोमनाथ दत्तु गावडे ( सर्व रा.बिरोबावाडी ता.दौंड जि. पुणे) व इतर ४ व्यक्तींवर बेकायदा गर्दी जमाव जमवुन गाडीवर पेट्रोल टाकुन गाडी ही जाणीवपुर्वक मुद्दाम नुकसान करण्याच्या उद्देशाने पेटवून नुकसान केल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटस पोलीस चौकीचे पोलीस नाईक हनुमंत भगत यांनी याबाबत फिर्याद दिली असून फौजदार संजय नागरगोजे हे पुढील तपास करीत आहेत.