राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती या पक्षाने दौंड शहरासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना भुरळ घातली आहे. तालुक्यात तेलंगणाच्या या पक्षाविषयी दिवसेंदिवस पसंती वाढत चालली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील पक्षात नाराज असलेले नेते या पक्षात प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत.
आगामी लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वीच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी याने वाढली आहे. भारत राष्ट्र समितीचा ‘तेलगंणा पॅटर्न’ आता महाराष्ट्रात राबवून सत्ता आणण्यासाठी बीआरएस पक्षाचे अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी कंबर कसली आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकी महाराष्ट्रात उतरण्याची बीआरएसची तयारी सुरु असताना बीआरएसने आता महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील सावखेडा ग्रामपंचायतीवर (ता.गंगापूर) बीआरएसने झेंडा फडकावला आहे. तर तेलंगण राज्यातील शेतीविषयीचे धोरण, मोफत वीज तसेच अनेक मुलभूत सोयी सुविधा सर्वसामान्यांसाठी यशस्वी उपाययोजना राबवल्याने शेतकऱ्यांची ही पसंती या पक्षाला मिळू लागली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांची विचारधारा जोपासणारा पुरोगामी पक्ष म्हणून याची महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बीआरएस पक्षात अनेक पक्षातील नेते व कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. या पक्षाची सध्या दौंड तालुक्यातही जोरदार चर्चा सुरू आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्ग अर्थात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर ते पाटस पर्यंत ठिकठिकाणी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर व पाटस ते दौंडपर्यंत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाचे बॅनर झळकत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी तेलंगणात जाऊन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश केला. राजाभाऊ कदम सध्या या पक्षाचा प्रचार तालुक्यातील गावा गावात जाऊन करीत आहे. या पक्षात प्रवेश करण्यासाठी भारतीय जनता पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासह इतर संघटना व पक्षाचे अनेक मातब्बर नेते व कार्यकर्ते प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत, आगामी दौंड महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुसाठी बीआरएस हा पक्ष सज्ज झाला असुन पूर्ण ताकतीन या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी तालुक्यातील अनेक दिग्गज नेते इच्छुक आहेत असा दावा राजाभाऊ कदम यांनी केला आहे. सध्या बीआरएस या पक्षाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू असुन या पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात दिसत आहे. लोकसभा निवडणुका पूर्वी या पक्षात सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दौंड तालुक्यात मराठा, दलित, ओबीसी व मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी प्रवेश केला तर ही भाजप व राष्ट्रवादी साठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास याचा मोठा फटका भाजप आमदार राहुल कुल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व माजी आमदार रमेश थोरात यांच्यासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. मात्र भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचने हा दावा फोल ठरवला असुन त्याचा काही परिणाम राजकीय वर्तुळात होणार नसल्याचा दावा ते करीत आहेत. बीआरेस पक्षाकडुन आर्थिक आमिषाला बळी पडून तसेच काही आर्थिक फायद्यासाठी ही या पक्षात प्रवेश करतील असाही आरोप राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे तर बीआरएस हा पक्ष भाजपचेच पिल्लू असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.