बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील खांडज मध्ये 21 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळच्या वेळी 22 फाटा येथे ही घटना घडली होती. घटनेमध्ये धनाजी मारुती कांबळे हे मृत्यू पावले. धनाजी कांबळे हे त्यांच्या घराचे बाहेर ओट्यावर बसले होते. त्यावेळी विजय मिसाळ हा तिथे आला आणि त्याने कांबळे यांना शिवीगाळ करत रात्री माझ्या पुतण्याला का मारले? असे म्हणत शिवीगाळ केली.
त्यावर धनाजी यांनी आरोपीला समजावून सांगितले, मात्र त्याच वेळी विजय मिसाळ याने घराच्या मागे जाऊन बाभळीचे मोठे दांडके आणले आणि धनाजी कांबळे यांच्या जोरात डोक्यात मारले. धनाजी यांना डोक्यात गंभीर दुखापत झाली. त्यांना बारामतीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर पोलिसांनी विजय मिसाळ याच्या विरोधात भादवि कलम 302 ई प्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास बारामती तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक निरीक्षक ए आर देवकाते यांनी केला होता. याची सुनावणी बारामतीतील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश श्रीमती जेपी दरेकर यांच्यासमोर चालली.
अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला. यावेळी हा युक्तिवाद करताना त्यांनी 11 साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाने दिलेला पुरावा आणि अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने भारतीय दंड विधान कलम 304 चा भाग दोन याप्रमाणे आरोपी विजय मिसाळ यास दोषी धरले व पाच वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावली.
ही घटना 2008 ची होती, तर 2009 मध्ये याचा खटला सुरू झाला. अनेक कारणाने तो लांबला, मात्र 2023 मध्ये जलदगतीने यावर सुनावणी झाल्या. त्यामध्ये अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर आरोपी न्यायालयात हजर राहिला नाही. त्यास वॉरंटमध्ये पकडून आणल्यानंतर आरोपीला न्यायालयाने शिक्षा सुनावली. या प्रकरणांमध्ये कोर्ट भैरवी म्हणून नामदेव नलवडे व पोलीस हवालदार अभिमन्यू कवडे यांनी सरकार पक्षास मदत केली.